Join us

बेस्ट खाजगीकरणाच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:07 AM

मुंबई : बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावर बसगाड्या घेतल्यानंतर चालक - वाहकदेखील कंत्राटी पद्धतीने घेऊन खाजगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मात्र ...

मुंबई : बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावर बसगाड्या घेतल्यानंतर चालक - वाहकदेखील कंत्राटी पद्धतीने घेऊन खाजगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मात्र कामगार संघटनांपाठोपाठ आता भाजपनेही यास तीव्र विरोध दर्शविला आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्षाने ‘बेस्ट’ खासगीकरणाचा डाव आखला आहे. याविरोधात रस्त्यावर उतरू व न्यायालयातही दाद मागू, असा इशारा भाजपने दिला आहे.

सीएनजीवर चालणाऱ्या चारशे बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. मात्र या बस गाड्यांवर वाहक आणि चालक खाजगी कंपनीचे असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने मंगळवारी बेस्ट समितीपुढे मांडला होता. या वेळी भाजपचा विरोध डावलून शिवसेना व काँग्रेस पक्षाने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे भाजपने आता हा मुद्दा उचलून धरत शिवसेनेला धारेवर धरण्याची तयारी सुरू केली आहे.

खाजगीकरणाच्या या प्रस्तावावर मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत तब्बल सात तास मॅरेथॉन बैठक पार पडली. या वेळी बेस्टने ४०० भाडेतत्त्वावरील बसगाड्यांवर चालकासोबतच वाहकही घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बेस्ट उपक्रम भाडेतत्त्वावर बस पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला दोन हजार कोटी रुपये मोजणार आहे. संबंधित ठेकेदाराला कंत्राट मिळण्यासाठी निविदा प्रक्रियेची मुदत पाच वेळा विविध कारणास्तव वाढविण्यात आल्याचा आरोप भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला.

१७ फेब्रुवारीला मोर्चा

सत्ताधारी शिवसेनेने बेस्टच्या अर्थसंकल्पाचे मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करण्याचे वचन दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. शिवसेनेला साथ देणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध करीत १७ फेब्रुवारी रोजी बेस्टच्या खासगीकरणाविरोधात मंत्रालयावर बेस्ट कृती समितीतर्फे मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

* बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागातच नव्हेतर, विद्युत विभागातही खासगी सेवा घेण्यात येणार आहे. बेस्टच्या ताफ्यात सध्या ३,६०० बसगाड्या असून यामध्ये भाडेतत्त्वावरील १,१०० बसगाड्या आहेत. सहाशे नवीन बस भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव आहे.