चार राज्यांच्या विधानसभेत भाजपला यश मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 06:32 AM2021-09-07T06:32:57+5:302021-09-07T06:33:21+5:30
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा दावा
दिनकर रायकर
मुंबई : पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत, पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपाला निर्विवाद बहुमत मिळवून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकमतशी बोलताना केला. पंजाबमध्येही अंतर्गत कलहामुळे काँग्रेसचा पराभव होईल आणि आम आदमी पक्षाला यश मिळेल, असेही आठवले म्हणाले.
लोकमतला दिलेल्या सदिच्छा भेटीच्या वेळी बोलताना आठवले म्हणाले, आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये पुरेसे बहुमत मिळाले नाही, तर ते अकाली दलाच्या सोबत जातील. दोघे मिळून सरकार बनवू शकतील. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला या निवडणुकीत बसेल. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला पंजाबमध्ये थोडाबहुत बसू शकतो. मात्र पंजाबमध्ये तसेही भाजपचे फारसे संख्याबळ नाही. पण उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यात दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाचा फारसा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. शेतकरी आंदोलनाला लोक आता कंटाळले आहेत. केंद्र सरकारने कायदा रद्द न करता शेतकऱ्यांच्या बाकीच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा निवडून येतील. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. कारण समोर प्रभावी विरोधक नाहीत. विरोधकांनी एकत्र येऊन मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. तो फारसा यशस्वी होणारा नाही. कारण त्यांच्याकडे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व नाही. राहुल गांधी यांचे नेतृत्व मोदींच्या समोर फारसे प्रभावी ठरत नाही, हे आजपर्यंतच्या सात वर्षांतील निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले.
त्याचे उत्तर दोघेच देऊ शकतील
nमहाराष्ट्रात भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला असता आठवले म्हणाले, याचे उत्तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस हे दोघेच देऊ शकतील.
nआज तरी महाविकास आघाडी सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे चित्र आहे. कारण भाजप आणि शिवसेना एकत्र आले किंवा राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तरच राज्यात सत्ता बदल होऊ शकतो.
nआमदार फुटण्याची किंवा फोडण्याची स्थिती आज तरी मला दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत, हे सांगायलाही आठवले विसरले नाहीत.