मुंबई-
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपानं माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होईल अशी चर्चा होती. पण आता अंधेरीची पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
'राज ठाकरे मुर्दाबाद...', भाजपच्या माघारीनंतर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते आक्रमक
भाजपानं आपला उमेदवार मागे घेतला असला तरी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या एकूण १४ उमेदवारांपैकी ७ जणांनीच अर्ज मागे घेतला आहे. तर ७ जण निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होणार आहे. पण या निवडणुकीत आमच्या उमेदवार ऋतुजा लटके विक्रमी मतांनी निवडून येतील हे आता निश्चित झालं आहे, असं अनिल परब यांनी सांगितलं.
“अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपला पराभव दिसत होता, त्यामुळेच माघार घेतली”; जयंत पाटलांचा टोला
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपानं उमेदवार मागे घेऊन महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं आवाहन केलं. त्यानंतर भाजपानं आज पक्षांतर्गत बैठक घेत उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण भाजपानं उमेदवार मागे घेतला असला तरी मतदार संघातून एकूण १४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील आज ७ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. पण उर्वरित ७ जणांनी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे.