उद्याने, मैदानांबाबत भाजपा शिवसेनेच्या मैत्रीला जागले
By admin | Published: January 14, 2016 12:35 AM2016-01-14T00:35:34+5:302016-01-14T00:35:34+5:30
पालिकेची उद्याने व मैदाने देखभाल तत्त्वावर न देता दत्तक तत्त्वावर देण्यासाठी प्रशासनाने रणनीती आखली होती़ मात्र या धोरणाला आत्तापर्यंत विरोध करणारे भाजपा आज मैत्रीला
मुंबई : पालिकेची उद्याने व मैदाने देखभाल तत्त्वावर न देता दत्तक तत्त्वावर देण्यासाठी प्रशासनाने रणनीती आखली होती़ मात्र या धोरणाला आत्तापर्यंत विरोध करणारे भाजपा आज मैत्रीला जागले़ त्यामुळे वादग्रस्त ठरलेले हे धोरण बहुमताच्या जोरावर मंजूर करीत शिवसेनेने आपल्या नेत्यांच्या ताब्यात असलेल्या भूखंडावरील अधिकार कायम ठेवले आहेत़ भाजपच्या यू-टर्नवर मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाने विरोध दर्शवला.
काळजीवाहू तत्त्वावर दिलेल्या भूखंडांचे रुपांतर जिमखाना, क्लब हाऊसमध्ये झाल्याचा पुर्वानुभव असल्याने नवीन धोरण आखण्यात आले़ मात्र यातही तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला असलेल्या संस्थांकडे हे भूखंड कायम ठेवण्याची अट टाकून शिवसेनेने आपल्या नेत्यांचे हित जपले़ यामध्ये स्वपक्षीय खासदाराच्या भूखंडाचा समावेश असल्याने भाजपाने या धोरणाला प्रारंभी पाठिंबा दिला होता़ मात्र सामाजिक संस्थांकडून विरोध वाढू लागताच भाजपाने विरोध सुरु केला़ पालिकेने २०१४ पूर्वी खाजगी संस्थांना दिलेल्या भूखंडांचे आॅडिट करण्याची भूमिका भाजपाकडून मांडण्यात आली़ यामुळे मोठ्या प्रमाणात भूखंडांचा ताबा असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची गोची झाली होती़ मात्र पालिकेच्या महासभेत आज हे धोरण मंजुरीसाठी येताच भाजपाने यू-टर्न घेत आपली भूमिका बदलली़ काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्षाने प्रखर विरोध दर्शविला़ या धोरणामुळे भूखंडाचे श्रीखंड खाण्यासाठी बिल्डर आणि नेत्यांचा मार्ग मोकळा होईल, असा आरोप विरोधकांनी यावेळी केला़ हा प्रस्ताव रद्द करण्याची उपसुचना विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी
मांडली़ विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला़ मात्र भाजपाच्या सहकार्याने शिवसेनेने हे धोरण मंजूर करुन घेतले़ (प्रतिनिधी)
...तर अशी होईल कारवाई
पालिकेच्या धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या पंचतारांकित क्लबची तपासणी करुन कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले़ तसेच दत्तक तत्त्वावर दिलेली मैदाने व उद्यानांचा व्यावसायिक वापर होऊ देणार नाही़ भूखंडाची देखभाल करण्याची जबाबदारी घेणाऱ्या संस्था माहितीच्या अधिकारात येतील़ या भूखंडांवर व्यायामशाळा, क्ल्ब बांधता येणार नाहीत़ तसेच स़ ६ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहतील व कोणत्याही बांधकामास परवानगी देणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़आर श्रीनिवास यांनी दिली़
हे आहेत काळजीवाहू तत्त्वावरील नऊ भूखंड
बोरीवली येथील बिगर शासकीय संस्था सिटी स्पेस, विलेपार्ले येथील रमेश प्रभू यांचे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे मातोश्री सुप्रिमो क्लब, खासदार गोपाळ शेट्टी यांचा पोईसर जिमखाना, कमला विहार स्पोर्ट्स क्लब, वीर सावरकर उद्यान, झाँसी की रानी उद्यान, विनोद घोसाळकर यांच्या संस्थेकडे असलेले दहिसर स्पोटर््स फाऊंडेशन आणि शिवसेनेचे नेते व मंत्री सुभाष देसाई यांच्या संस्थेकडे असलेले गोरेगाव येथील प्रबोधन.