मुंबई : बोरीवली येथील भाजप नगसेविकेच्या संपर्क कार्यालयात झालेल्या भाजप कार्यकर्तीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोरीवली पोलीस ठाणे तसेच पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची भेट घेतली. या प्रकरणात कोणतीही कुचराई न करता आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्तांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले. महापौरांनी नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवसेना नेत्या डॉ. शुभा राऊळ तसेच महिला पदाधिका-यांसोबत उपायुक्त विशाल ठाकूर यांची भेट घेतली. पीडित महिलेने महिन्यापूर्वी लेखी तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.
‘मुंबई पोलिसांवर आम्हाला विश्वास’ मुंबई पोलिसांवर आम्हाला विश्वास आहे. आरोपी पळून गेल्याबाबत विचारले असता, पोलिसांनी मला तसे काही घडले नसल्याचे सांगितल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. वकिलावर दिवसाढवळ्या तलवारीने झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आलेले परिमंडळ ११ आता महिलांबाबत घडलेल्या गुन्ह्याला पाठीशी घालत असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार याची वरिष्ठांनी दखल घेणे आवश्यक असल्याचे यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी म्हणाले.