लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हरयाणात स्वबळावर लढत भाजपने बहुमत मिळविल्यामुळे आणि जम्मू-काश्मीरमध्ये घवघवीत यश मिळवल्याने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे मनोधैर्य वाढले आहे, तर काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विधानसभा जागावाटपात मित्रपक्षांवर अधिक दबाव आणण्यासाठी ही बाब पूरक ठरेल, असे मानले जात आहे.
दोन्ही राज्यांच्या निकालाचे राज्यातील महायुती व मविआ या दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपांवर परिणाम होण्याची चर्चा आहे. एकीकडे महायुतीत भाजपची ताकद वाढलेली असेल तर दुसरीकडे दोन्ही राज्यांत चांगले यश न मिळाल्याने काँग्रेसला राज्यात चैतन्य निर्माण करण्यासाठी रणनीती बदलावी लागू शकते.
दोन्हा आघाड्यांची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आता मविआत उद्धव सेना व शरद पवार गट तर महायुतीत भाजप जादा जागांसाठी आग्रही राहण्याची चिन्हे आहेत.
‘या निकालाने तर आमची चिंताच दूर केली...’
लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवामुळे नाउमेद झालेल्या भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांना या विजयाने संजीवनी दिली आहे. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे सगळे प्रयत्न आम्ही केले; पण यश आले नाही. मात्र, आजच्या विजयाने आमची मोठी चिंता दूर केली, असे एका भाजप नेत्याने म्हटले.
हरयाणा पॅटर्नची अंमलबजावणी महाराष्ट्रातही?
भाजपला हरयाणात विजय मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्याच्या सूचना प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आल्या. पक्षात चैतन्य यावे, विधानसभा निवडणुकीसाठी त्याचा फायदा व्हावा, हाच या जल्लोषामागील उद्देश असल्याचे स्पष्ट आहे. हरयाणात भाजप हरणारच, असे चित्र रंगविले जात असताना प्रचाराचे आणि रणनीतीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. त्यासाठी दिल्लीतील मुख्यालयाकडून जो पॅटर्न देण्यात आला होता, त्याची अंमलबजावणी आता महाराष्ट्रातही केली जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा : ठाकरे
महाराष्ट्र आणि हरयाणातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे सांगत काँग्रेसच्या राज्यातील कामगिरीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदासाठी आपला उमेदवार जाहीर करावा. त्याला माझा पाठिंबा आहे. महाराष्ट्र वाचविण्यासाठी जे काही करायचे असेल ते मी करेन, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.