मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरुद्ध अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 100 हून अधिक ठिकाणी तक्रारी (एफआयआर) दाखल केल्या आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले.
पटोले यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहील, असेही भांडारी यांनी नमूद केले. तसेच पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करताना पोलिसांनी जो न्याय लावला तोच न्याय लावून पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी भाजपाची मागणी आहे असं देखील म्हटलं आहे.