- गौरीशंकर घाळे मुंबई : काश्मीरबाबत कणखर निर्णय घेतल्याने कधी नव्हे इतके भाजपला अनुकूल वातावरण आहे. पक्षासाठी ही अत्यंत चांगली राजकीय संधी आहे. नंतर अशी संधी मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे आताच पक्ष जेवढा विस्तारता येईल, बळकट करता येईल त्याचा विचार करा, असे सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करणे सुरू ठेवल्याने मुंबई उपनगर जिल्ह्यातील लढती नेमक्या कशा होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.या जिल्ह्यातील २६ जागांपैकी २३ युतीकडे आहेत. शिवसेना आणि भाजपचे आमदार असलेल्या २३ जागांव्यतिरिक्त उर्वरित तीन जागांच्या वाटणीवरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. तीनपैकी चांदिवली आणि मालाड या दोन मतदारसंघात काँग्रेसचे तर शिवाजीनगर मानखुर्दमध्ये समाजवादी पक्षाचे अबू आझमी आमदार आहेत.मालाडची जागा अवघ्या २३०० मतांनी गमवावी लागली, त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत मात्र पक्षाने मुसंडी मारली. त्यामुळे ही जागा सोडू नये, अशी भूमिका स्थानिक भाजप नेत्यांनी घेतली आहे. चांदिवली आणि शिवाजीनगरमध्ये मात्र शिवसेना उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवसेनेने मात्र, या तीनही जागांवर आपला दावा कायम राहील यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यामुळे शिवाजी नगरमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मालाड आणि शिवाजीनगरच्या या दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आणि चांदिवलीची जागा भाजपला अशी तडजोड होण्याचीही शक्यता आहे. शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते या जागांसाठी आग्रही असलेतरी केवळ तीन जागांवरून वातावरण कलुषित होणार नाही, याची काळजी दोन्ही बाजून घेतली जात आहे. विद्यमान आमदारांच्या जागा सोडल्या तर केवळ तीन जागांचा प्रश्न आहे. काही अडचण आलीच तर थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या पातळीवर निर्णय होईल, त्यामुळे उगाच खाली राडा करण्यात अर्थ नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.तिकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात मात्र शांतता आहे. चांदिवलीतून विद्यमान आ. नसीम खान यांच्या जागेचा अपवाद सोडल्यास अन्यत्र फार काही हालचाल दिसत नाही. मालाडचे आ. अस्लम शेख सध्या पक्षांतर्गत वादाने हैराण आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशाचीही चर्चा आहे. तर बाकीचे काँग्रेस नेते हवा बदलेल या आशेवर आहेत. काही ठिकाणी युतीच्या विद्यमान आमदारांसमोर पक्षांतर्गत आव्हानांची डोकेदुखी आहे. शिवाय, खराब कामगिरीमुळे काही आमदार डेंजर झोनमध्ये गेल्याचे भाजपच्याच सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मात्र, अशा ठिकाणीसुद्धा आघाडीचे नेते शांत आहेत. युतीच्या आमदारांच्या खराब कामगिरीचा लाभ उठविण्याचीही तसदी घेतली जात नाही. भविष्यात मतदारसंघावरचा दावा कायम राहावा, इतकीच माफक अपेक्षा बाळगून राजकारण केले जात असल्याचा आक्षेप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत आहे. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांमुळे जनाधार असणाºया अनेक नेत्यांनी पाच वर्षांत भाजपचा रस्ता धरला. राजहंस सिंह, रमेश ठाकूर, कृष्णा हेगडे या कधीकाळच्या आमदारांपासून दुसºया फळीतील अनेक नेत्यांनी पक्षाला यापूर्वीच रामराम ठोकला आहे. जे अजून काँग्रेसमध्ये आहेत ते आज ना उद्या बाहेरचा रस्ता पकडणार, अशी चर्चा असते. त्यामुळे निम्म्याहून अधिक मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. युतीच्या जागावाटपात अनेकांना संधी मिळणार नाही. युतीत बंडखोरी होईल व त्याचा थेट फायदा काँग्रेसलाच होणार, असा दावा काही काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. तिकडे राष्ट्रवादी आक्रसत असल्याचे चित्र आहे. अणुशक्ती नगरमधून नवाब मलिक तगडे आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. तर कुर्ला येथून मिलिंद कांबळे यांचे नाव चर्चेत आहे. शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात सपाचे अबू आझमी यांची दावेदारी मजबूत आहे. मनसेच्या गोटात मात्र गोंधळाचे वातावरण आहे. मनसे रिंगणात उतरणार की नाही, इथून सुरुवात होते. पक्षप्रमुख म्हणतील तेच पक्षाचे धोरण. पण, या गोष्टी सामान्य मनसैनिकाला माहीत असाव्यात, त्या अनुषंगाने पक्षाचा म्हणून काही कार्यक्रम स्थानिक पातळीपर्यंत राबवावा अशी स्थिती नाही. नाराजीचा फायदा उठविण्याचा विचारकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात सध्या कमालीची शांतता असली, तरी युतीतील अंतर्गत हेवेदावे, धुसफूस, असंतुष्ट किंवा नाराज नेते, त्यांच्यातील कुरघोडीचा फायदा उठवता येईल का, एवढाच विचार सध्या सुरू आहे.सध्याचे पक्षीय बलाबलएकूण जागा २६भाजप - १२शिवसेना - ११काँग्रेस - २सपा - १
मुंबई उपनगरात भाजपच्या कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 3:03 AM