Join us

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?; उद्धव ठाकरे आमदार झाले अन् मुख्यमंत्रिपदावर कायम राहिले तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 12:33 PM

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त २ रिक्त जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंचे नाव घोषित करावे यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे मंत्रिमंडळाने शिफारस दिली आहे

ठळक मुद्देअद्याप उद्धव ठाकरेंच्या आमदारकीची कोणतीही घोषणा राज्यपालांकडून करण्यात आली आहे२८ मे पर्यंत मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना आमदार होणं गरजेचेराज्यपाल घटनेनुसार आणि कायद्याच्या चौकटीत राहून योग्य निर्णय घेतील असा भाजपाला विश्वास

मुंबई – राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक आहे. उद्धव ठाकरेंची ही मुदत २८ मे रोजी संपत आहे त्यामुळे तत्पूर्वी त्यांना आमदार व्हावं लागेल अन्यथा राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहणार नाही.

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त २ रिक्त जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंचे नाव घोषित करावे यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे मंत्रिमंडळाने शिफारस दिली आहे मात्र अद्याप उद्धव ठाकरेंच्या आमदारकीची कोणतीही घोषणा राज्यपालांकडून करण्यात आली आहे. आता केवळ एक महिना शिल्लक आहे. कोरोना संकट उभं राहिलं नसतं तर विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक झाली असती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आमदार होणं सहज शक्य होतं. पण कोरोनामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या विधान परिषदेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याने महाविकास आघाडीसमोर उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद टिकवणं आव्हान बनलं आहे.

अशातच राज्यपालांकडून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा होण्यास विलंब होत आहे. भाजपाकडून जाणुनबुजून उद्धव ठाकरेंना आमदार होऊ नये असं राजकारण खेळलं जात आहे असा आरोप करण्यात येत आहे. मात्र हे आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळत सांगितलं आहे की, आम्हाला मागच्या दारानं सत्ता स्थापन करण्यास रस नाही. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद नियुक्तीवरुन राज्यपाल घटनेनुसार आणि कायद्याच्या चौकटीत जे योग्य आहे त्यानुसार निर्णय घेतील असा विश्वास आहे असं ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे आमदार झाले आणि मुख्यमंत्रिपदी कायम राहिले तर भाजपाला आनंदच आहे. राज्यात राजकीय अस्थिरता नको असंही देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे वारंवार राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यातच त्यांनी आणिबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे. हे पत्र त्यांची दिशाभूल करणारे आहे. तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपाला वाटत असून त्यासाठी सर्व प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी भाजपावर केला आहे. त्याचप्रमाणे राज्यपाल कुणाच्यातरी सूचनेनुसार, विनंतीनुसार आणि मनाप्रमाणे वागतात असं आमचं आजही मत नाही. राज्यपाल हे स्वतंत्र विचाराचे आहेत. ते निर्भीडही आहेत. त्यामुळे याप्रश्नी ते निर्भीडपणे निर्णय घेतील असा आमचा विश्वास असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोनानंतर ‘या’ गंभीर समस्येला तोंड द्यावं लागेल; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

मोदी हे तो मुमकिन है! उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन भाजपा आमदाराचा शिवसेनेला टोला

...अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल; उद्धव ठाकरेंनी फोनवरुन पंतप्रधानांना सांगितलं

भाजपाचे सगळे प्रयत्न त्याचसाठी सुरू आहेत; जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेमुख्यमंत्रीभाजपा