शिवसेनेच्या कोंडीसाठी स्थायी समितीवर भाजपचे आक्रमक चेहरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 02:40 AM2020-09-29T02:40:05+5:302020-09-29T02:40:52+5:30
पालिका वैधानिक समित्यांच्या नव्या सदस्यांची नावे जाहीर
मुंबई : सत्ताधारी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपने महत्त्वाच्या स्थायी समितीवर ज्येष्ठ नगरसेवकांची वर्णी लावली आहे. वैज्ञानिक समित्यांवरील सर्व नवीन सदस्यांची नावे पालिकेच्या महासभेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी जाहीर केली. यापैकी पालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीत पाच नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे. यामध्ये शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, हरीष भांदिर्गे आणि आशा मराठे, भाजपचे भालचंद्र शिरसाट, उज्ज्वला मोडक यांचा समावेश आहे.
पालिकेच्या स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट या वैधानिक समित्यांमधील ५० टक्के सदस्यांची मुदत दर दोन वर्षांनी १ एप्रिल रोजी संपते. यावर्षी मार्चपासून कोरोनाच्या प्रभावामुळे पालिकेतील सर्व समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. या निवडणुका आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यानुसार शिक्षण, स्थायी, बेस्ट, सुधार समितीसह अन्य समित्यांच्या निवडणुकांना ५ आॅक्टोबरपासून होईल. त्यानुसार नवीन सदस्यांची नावे सोमवारी जाहीर झाली. शिक्षण समिती ११, स्थायी समिती १३, सुधार समिती १३ व बेस्ट समिती सदस्यांची नावे महापौरांनी जाहीर केली.
निवडणुकांचे वेळापत्रक
शिक्षण व स्थायी समिती-५ आॅक्टोबर
बेस्ट आणि सुधार समिती-६ आॅक्टोबर
स्थापत्य शहर व उपनगर-७ आॅक्टोबर
सार्वजनिक आरोग्य आणि बाजार व उद्यान समिती - ८ आॅक्टोबर
विधी आणि महिला व बालकल्याण समिती - ९ आॅक्टोबर
प्रभाग समित्या - १४ ते १६ आॅक्टोबर