मुंबई : मुंबईतील मोकळे भूखंड आणि मैदाने दत्तक देण्याच्या महापालिकेच्या योजनेवरून वादंग माजले असताना, या वादात रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उडी घेतली. त्यांनी मित्रपक्ष भाजपाचा खरपूस समाचार घेतला. आधी महापालिकेत योजना बहुमताने मंजूर करायची आणि नंतर त्यावर टीका करायची ही कसली नीती, असा प्रश्न करत, हिंमत असेल तर यावर खुली चर्चा करा, असे आव्हानही उद्धव यांनी भाजपाले दिले. जोगेश्वरी येथील भुयारी मार्ग रुंदीकरण कामाचे भूमिपूजन रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर बोलताना ठाकरे यांनी भाजपाच्या भूमिकेवर सडकून टीका केली. ‘शिवसेना दत्तक योजनेचे अंधळे समर्थन करीत नाही. महापालिकेत बहुमताने हा प्रस्ताव संमत करण्यात आला. एकट्याने प्रस्ताव रेटायला शिवसेनेकडे लोकसभेसारखे बहुमत नाही. महापालिकेत युतीची सत्ता असली, तरी धोरण आयुक्त ठरवतात आणि आयुक्तांची नियुक्ती राज्य शासनानेच केली आहे,’ असे सांगत उद्धव यांनी योजनेचे खापर राज्य सरकार आणि भाजपावर फोडले. शिवसेना धोरणाचे नाही, तर जनतेच्या हक्कांचे समर्थन करते. जनतेसाठीचा असलेला भूखंड कोणालाही गिळंकृत करू देणार नाही. महापालिकेच्या नव्या धोरणानुसार दत्तक दिलेल्या मैदानांवर बांधकाम होऊ देणार नाही. बांधकामालाच विरोध असेल, तर एमसीए क्लबला दिलेली जागेच्या १५ टक्के भागात बांधकाम करण्याची परवानगीदेखील रद्द करावी, असा टोला उद्धव यांनी लगावला. मोकळी मैदाने म्हणजे अतिक्रमणाला आमंत्रण देण्यासारखे आहे. दत्तक योजनेला विरोध करणाऱ्यांच्या मनात अतिक्रमणे करून हे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला. महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर जागतिक दर्जाचे उद्यान तयार करावे, या मागणीचाही ठाकरे यांनी पुनरुच्चार केला.
भाजपाचे वर्तन दुटप्पी
By admin | Published: January 18, 2016 3:13 AM