Join us

"...तोपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही"; भाजपाचा आर दक्षिण प्रभाग कार्यालयावर 'विश्वासघात' मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 15:04 IST

Atul Bhatkhalkar : जोपर्यंत सामान्य मुंबईकरांच्या मदत मिळणार नाही व मागण्या मान्य होणार नाहीत, तोर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही, आगामी काळात या संदर्भात आणखी मोठे जन आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही आमदार भातखळकर यांनी दिला.

मुंबई - गेल्या वर्षभरात चार वेळा झालेली अतिवृष्टी आणि दोनवेळा आलेले चक्रीवादळ यामुळे नुकसान झालेल्या सामान्य मुंबईकरांना राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेकडून कोणतीही मदत न केल्याबद्दल तसेच विविध मागण्यांची पूर्तता केली नाही. याचा जाब विचारण्यासाठी आज दुपारी मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपाच्यावतीने आर/दक्षिण प्रभाग कार्यालयावर ‘विश्वासघात मोर्चा‘ काढण्यात आला.

२०१७ च्या निवडणुकीवेळी ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचे मालमत्ता कर माफ करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी न केल्याबद्दल, कथित हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ मुंबई व २४ तास पाणी देण्याचे आश्वासन न पाळली असल्याची टीका अतुल भातखळकर यांनी केली.

दारू दुकानदार, रेस्टॉरंट मालक, बिल्डर, उद्योगपती यांना करात ५० टक्के पेक्षा जास्त सवलत देणाऱ्या ठाकरे सरकारने सामान्य मुंबईकरांच्या तोंडाला मात्र पाने पुसण्याचे काम केले. मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरीव मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुद्धा मदत तर सोडाच पण साधे पंचनामे सुद्धा त्यांनी केले नाही, यासंदर्भात माहिती देण्यासाठी मुंबईतील भाजपाच्या सर्व आमदारांनी भेटण्यासाठी वेळ मागितली होती. ती सुद्धा त्यांनी दिली नाही, असे अतुल भातखळकर म्हणाले.

मुंबईतील नागरिक आर्थिक अडचणीत असताना सुद्धा राज्य सरकारने किंवा ८० हजार कोटी रुपयांच्या ठेवी व १६००  कोटी रुपये व्याजापोटी उत्पन्न असणाऱ्या मुंबई महानगर पालिकेने कोणतीही मदत दिली नाही. जोपर्यंत सामान्य मुंबईकरांच्या मदत मिळणार नाही व मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही, आगामी काळात या संदर्भात आणखी मोठे जन आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही आमदार भातखळकर यांनी दिला. यावेळी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :अतुल भातखळकरभाजपा