Join us

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिनी बॅनरबाजी, जाहिराती नको; भाजपचं कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 2:37 PM

देवेंद्र फडणवीस हे देशातील भाजपचे वरिष्ठ नेते मानले जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 5 वर्षे कार्यभार सांभाळला आहे

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंतत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, महाराष्ट्र भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलं आहे. त्यानुसार, फडणवीस यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी आणि जाहिरातबाजीवर खर्च करू नये, त्याऐवजी सामाजिक, विधायक उपक्रमातून योगदान द्यावं, असे आवाहन करण्यात आलं आहे. 

देवेंद्र फडणवीस हे देशातील भाजपचे वरिष्ठ नेते मानले जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 5 वर्षे कार्यभार सांभाळला आहे. तर, गेल्या महिन्यापर्यंत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलंय. सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत. राज्यातील सत्तांतर घडवून महाविकास आघाडीची सत्ता घालविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे, गावखेड्यातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ट्विट करत, भाजपच्या लक्षावधी कार्यकर्त्यांसाठी ते एक प्रेरणा आहेत, असे म्हटले होते. त्यामुळे, फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी करण्यात येते. मात्र, आता भाजपकडून कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे.  देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी असतो. मात्र, या वाढदिनी वर्तमानपत्रातून जाहिराती, बॅनरबाजी किंवा टीव्ही माध्यमातूनही जाहिरातबाजी न करण्याचं आवाहन भापजतर्फे करण्यात आले आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकूंद कुलकर्णी यांनी यासंदर्भातील पत्रच जारी केलं आहे. तर, भाजप नेते आणि पदाधिकारी यांनी या खर्चाला फाटा देत सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्रमुंबई