भाजपच्या प्रचाराचे कॉलसेंटर गुंडाळले; हजारो कर्मचारी बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 06:24 AM2019-05-23T06:24:24+5:302019-05-23T06:24:56+5:30

पूर्णवेळ नोकरीची दिली होती हमी : लोकसभेदरम्यान राज्यभर फोनद्वारे केला प्रचार

BJP's campaign call center closed; Thousands of employees unemployed | भाजपच्या प्रचाराचे कॉलसेंटर गुंडाळले; हजारो कर्मचारी बेरोजगार

भाजपच्या प्रचाराचे कॉलसेंटर गुंडाळले; हजारो कर्मचारी बेरोजगार

Next

- सूर्यकांत वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्टÑासह इतर काही राज्यांमध्ये भाजपच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेले कॉलसेंटर, निवडणुका संपताच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांवर अनपेक्षितपणे बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. तुर्भे येथील एव्हरेस्ट निवारा या इन्फोटेक पार्कच्या इमारतीमध्ये मागील सहा महिन्यांपासून हे कॉलसेंटर सुरू होते.


लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच, भाजपच्या प्रचारासाठी चालविले जात असलेले कॉलसेंटर रातोरात गुंडाळण्यात आल्याचे उघड झाले आहे. नोएडा येथील व्हिजन इंडिया या कंपनीमार्फत तुर्भे इंदिरानगर येथील एव्हरेस्ट निवारा इन्फोटेक पार्क इमारतीमध्ये हे कॉलसेंटर चालत होते. मात्र, प्रमुख कंपनी वेगळीच असून, तिचे नाव कामगारांपासून गुप्त ठेवण्यात आले आहे. मुंबईच्या एका प्लेसमेंटमार्फत कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर, मागील सहा महिन्यांपासून त्या ठिकाणी हे कॉलसेंटर चालविले जात होते.


कर्मचाºयांच्या नेमणुकीवेळी डेटा इंट्रीचे काम असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराविषयी त्यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर, सुमारे एक हजार कर्मचाºयांकडून राज्याच्या विविध भागांतील मतदारांना फोन करून ‘नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपला जिंकून द्या’ असा संदेश दिला जात होता. त्यामध्ये मुंबईसह सातारा, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ यासह इतर अनेक भागांचा समावेश होता. काही कामगारांकडून मुंबईच्या काही भागांत प्रत्यक्ष फिरून राजकीय सर्व्हेही करून घेण्यात आला होता.
कर्मचाºयांना सहा तासांसाठी १२ ते १५ हजार रुपये मासिक वेतनासह नोकरीचीही हमी देण्यात आली होती. त्यामुळे अनेक जण हातची नोकरी सोडून येथे नोकरीला लागले होते. मात्र, लोकसभेचा शेवटचा टप्पा संपताच, २० मे रोजी कर्मचाºयांना अचानक २० दिवसांची सुट्टी देण्यात आली. त्याच रात्री ज्या कामासाठी कॉलसेंटर सुरू केले होते, ते काम संपल्याने कॉलसेंटर बंद झाल्याचे ईमेलद्वारे कळविण्यात आले. त्यामुळे संतप्त कर्मचाºयांनी मंगळवारी कॉलसेंटरबाहेर गर्दी केली होती. संभाव्य परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.


काम संपल्याने कर्मचाºयांना कमी केल्याचे व्हिजन इंडियाचे प्रदीप पाणी यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, केवळ लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या प्रचारासाठी हे कॉलसेंटर सुरू केल्याची माहिती सुरुवातीपासून लपविण्यात आल्याचा कर्मचाºयांचा आरोप आहे. त्यामुळे डेटा इंट्रीच्या नावाखाली सुरू केलेले कॉलसेंटर भाजपच्या प्रचारासाठी वापरल्यानंतर, रातोरात बंद करून कर्मचाºयांना बेरोजगारीच्या संकटात टाकल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

मतदानाच्या दिवशीही
सुरू होता प्रचार

नवी मुंबईत २९ एप्रिलला मतदान असतानाही त्या दिवशी सदर कॉलसेंटरमधून भाजपच्या प्रचाराचे काम सुरू होते. या दरम्यान कोणाचा हस्तक्षेप होऊ नये, याकरिता मोठ्या प्रमाणात बाउन्सर नेमण्यात आले होते. त्यामुळे या कॉलसेंटर चालकाकडून आचारसंहितेचा भंग झाल्याच्या कारणावरून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

विरोधात जाणाºयांना नोकरीतून कमी
घोषित केलेली सुट्टी ऐनवेळी रद्द केल्याने, काही कामगारांनी मनसेमार्फत व्यवस्थापनाविरोधात बंड पुकारले होते. त्यामुळे २८ एप्रिलला मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंच्या शिष्टमंडळाने धडक दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्या तक्रारदार कर्मचाºयांवर कामात हलगर्जीचा ठपका ठेवून काढण्यात आले.

व्हिजन इंडियामार्फत चालणारे कॉलसेंटर अचानक बंद झाल्याच्या कारणावरून कामगारांनी जमाव जमविला होता. तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी मध्यस्ती करून प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. काम संपल्याने कर्मचाºयांना कामावरून कमी केल्याचे व्हिजन इंडियाचे प्रदीप पाणी यांनी सांगितले. या संदर्भात कर्मचाºयांना अगोदरच कल्पना दिलेली होती, असेही त्यांनी सांगितले आहे.
- अमर देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुर्भे एमआयडीसी.

Web Title: BJP's campaign call center closed; Thousands of employees unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.