Join us

भाजपाच्या प्रचार रथाची अज्ञातांकडून नासधूस; ईशान्य मुंबई मतदारसंघातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 7:50 PM

आज (रविवारी) ईशान्य मुंबई मतदारसंघात काही अज्ञातांनी भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचाररथाची नासधूस केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन स्वतः कोटेचा यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, कंबर कसून प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. अनेक नेते एक-मेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. मात्र, यातच आज (रविवारी) ईशान्य मुंबई मतदारसंघात काही अज्ञातांनी भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचाररथाची नासधूस केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन स्वतः कोटेचा यांनी केले आहे.

काय म्हणाले कोटेचा? -या घटनेनंतर मिहीर कोटेचा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "माझ्या प्रचाररथाची समाजकंटकांनी नासधूस केली. आज संविधानाची निर्मीती करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. अशा दिवशी त्यांनी दिलेल्या लोकशाही मार्गाने लढाई लढण्यापेक्षा विरोधक तरूणांचे माथे भडकवून जातीयवादी रंग देण्याचे भेकड कृत्य करत आहेत. याचा मी निषेध करतो आणि आपल्या भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण संयम राखावा."

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. मुलुंड आणि घाटकोपर हे मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ला आहेत. गेल्या निवडणुकीत या भागातून सर्वांत जास्त मतदान झाल्याने त्याचा फायदा विद्यमान खासदार मनोज कोटक यांना झाला होता. यावेळी मिहीर कोटेचा यांना पक्षाने संधी दिली आहे. तसेच, भांडुप, विक्रोळी हे सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातात. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४निवडणूकमुंबईराजकारणभाजपामिहिर कोटेचा