मुंबई : विधान परिषदेच्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी कोणालाही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. खडसे हे फडणवीस यांचे विरोधक मानले जातात, तर पंकजा मुंडे यांनीही अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्यावर मध्यंतरी टीका केली होती. फडणवीस मुख्यमंत्री असताना तावडे हे कधीही त्यांचे निकटवर्ती नव्हते. मात्र बावनकुळे हे फडणवीसांचे जवळचे मानले जातात. या चौघांना संधी द्यावी की विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत पडळकर, मोहिते पाटील यांना संधी देऊन अन्य दोन जागांसाठी पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असे पर्याय होते. त्यातील दुसरा पर्याय पक्षाने निवडला. प्रस्थापित नेत्यांऐवजी नवीन चेहºयांना संधी देण्यात आली.
भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने मात्र खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे यांच्यापैकी किमान दोघांना तरी संधी द्यावी असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाकडे धरला होता. मात्र पक्षनेतृत्वाने तो अमान्य केला अशी माहिती सूत्रांनी दिली. फडणवीस विरोधकांना न मिळालेली उमेदवारी आणि जाहीर झालेल्या नावांमध्ये फडणवीस यांच्या निकटवर्तीयांचा असलेला समावेश यामुळे उमेदवारी वाटपात फडणवीसांचा शब्द चालला असे म्हटले जाते. बावनकुळे यांच्याबाबत वरून नकार असल्याने फडणवीस यांनी दटके यांचे नाव सुचवले अशीही माहिती आहे. दटके हे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व फडणवीस या दोघांचेही निकटवर्ती आहेत.
मोहिते पाटील मराठा समाजाचे,पडळकर धनगर समाजाचे, दटके बारी समाजाचे तर गोपछेडे हे लिंगायत समाजाचे आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोहिते-पाटील आणि पडळकर हे भाजपमध्ये गेले होते. तसेच प्रवीण दटके हे फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. गोपछेडे यांचे नाव संघ भाजप वतुर्ळातून पुढे आले आहे. आजची यादी बघता त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा दिसतो.
पडळकर हे सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे लढले होते आणि त्यांनी दोन लाखावर मते घेतली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि बारामतीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना आव्हान दिले पण पडळकर यांचा दारुण पराभव झाला होता. धनगर समाजात प्रभावी असे नेतृत्व आज भाजपकडे नाही. आक्रमक नेते अशी पडळकर यांची ओळख आहे. माजी मंत्री महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत आणि त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपसोबत आहे पण पक्षात एक धनगर नेतृत्व पुढे यावे या दृष्टीने पडळकर यांना संधी दिली असल्याचे म्हटले जाते.
रणजितसिंह मोहिते हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत. मोहिते घराण्याचा सोलापूर व माढा या दोन लोकसभा मतदारसंघातील राजकारणावर प्रभाव आहे. प्रवीण दटके यांची कौटुंबिक पार्श्वभूमी संघ, भाजपचीच आहे. त्यांचे वडील प्रभाकरराव दटके हे नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष होते. विधान परिषदेसाठी पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या नावाची देखील चर्चा होती पण त्यांच्या नशिबी पुन्हा एकदा प्रतीक्षाच आली आहे.
मोदींना शिव्या देणाऱ्यास उमेदवारी दिली : खडसेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या घालणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. वषार्नुवर्षे राष्ट्रवादीत असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आणि निष्ठावंतांना डावलवण्यात आले. भाजप कोणत्या दिशेने जात आहे याचे चिंतन करण्याची गरज असल्याची टीका ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. ते म्हणाले की विधान परिषदेसाठी माझे, पंकजा मुंडे व चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव दिल्लीला शिफारस करून पाठवण्यात आले आहे असे मला सांगण्यात आले होते. मात्र आता आमच्या तिघांऐवजी नवीन माणसांना संधी देण्यात आली आहे त्यात एक पडळकर आहेत. जे धनगर समाजाचे नेते आहेत, ज्यांनी मोदी साहेबांच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. लोकसभा निवडणुकीत ते भाजपच्या विरोधात होते.ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले, मोदी गो बॅक असे म्हटले; शिव्या दिल्या त्यांना संधी देण्यात आली. मी चाळीस-बेचाळीस वर्षे भाजप मध्ये काम करत आहे. यावेळी विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने ती मिळू शकली नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्यांना संधी मिळाली असती तर मला आनंद झाला असता असेही खडसे म्हणाले.