नितीन पंडित
भिवंडी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला सध्या वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांना शिवसेनेने नुकतेच शिवबंधनात अडकवले. अशातच भाजप नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू केल्याने सेना कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर निश्चितच होणार असून, कोणत्याही कारणाने युती फिस्कटल्यास सेनेच्या उमेदवारांसमोर भाजपच्या उमेदवारांचे तगडे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे, सध्या एमआयएमला वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाल्यामुळे मुस्लिमबहुल मतदारसंघामध्ये एमआयएमसोबतच वंचित बहुजन आघाडीचेही महत्त्व वाढले आहे.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघावर शिवसेनेचे कायम वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचे आमदार रूपेश म्हात्रे हे सलग दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादीचे नेते अबू आसीम आझमी हे निवडून आले होते. मात्र, मुंबईतील गोवंडी आणि भिवंडी पूर्व या दोन्ही मतदारसंघांतून ते निवडून आल्याने त्यांना एका विधानसभेच्या जागेचा राजीनामा देणे गरजेचे होते. त्यावेळी भिवंडीतील समाजवादी पक्षासह अबू आझमी यांच्या चाहत्यांनी आझमींनी भिवंडी पूर्वचा राजीनामा देऊ नये, असा आग्रह धरला होता. मात्र, येथील कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास करून अबू आझमी यांनी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला. त्यानंतर या जागेवर २०१० साली पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे रूपेश म्हात्रे या नव्या चेहऱ्याला उमेदवारी देण्यात आली, तर समाजवादीतर्फे अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसकडून मुजफ्फर हुसैन यांनी निवडणूक लढवली होती. एकीकडे अबू आझमी यांनी कार्यकर्त्यांचा केलेला भ्रमनिरास आणि दुसरीकडे काँग्रेसने आयात केलेला उमेदवार, असे चित्र असताना नव्या चेहºयाला संधी देणाºया शिवसेनेला फायदा होऊन रूपेश म्हात्रे यांचा विजय झाला होता. त्यावेळी रूपेश म्हात्रे हे अवघ्या १६७६ मतांनी विजयी झाले होते. २०१० ते २०१४ या पाच वर्षांच्या काळात रूपेश म्हात्रे यांनी विधानसभा मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सेना-भाजपची नाट्यमय फारकत होऊनही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे आमदार रूपेश म्हात्रे यांचा विजय झाला. त्यावेळी आलेल्या मोदीलाटेचा फायदा भाजपचे उमेदवार संतोष शेट्टी यांनी घेतला. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडल्याने शेवटच्या क्षणाला सेनेने बाजी मारल्याने रूपेश म्हात्रे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा विजयाची माळ पडली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संतोष शेट्टींनी त्यावेळी आमदार रूपेश म्हात्रे यांना चांगलीच टक्कर दिली होती. अवघ्या ३३९३ मतांनी रूपेश म्हात्रे विजयी झाले होते.
एकीकडे रूपेश म्हात्रे यांची १० वर्षांची कामगिरी व अनुभव, तर दुसरीकडे भाजपची वाढती लोकप्रियता आणि मागील पाच वर्षांत संतोष शेट्टी यांनी केलेले सर्वेक्षण हे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेष म्हणजे, सेना-भाजपची युती झाली तरी, रूपेश म्हात्रे यांच्याविरोधात अपक्ष अथवा इतर पक्षांतून निवडणूक लढवण्याची तयारी भाजपचे संतोष शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्यासमोर त्यांचे मोठे आव्हान राहणार आहे. भाजपचे संतोष शेट्टी मागील २५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या विधानसभा निवडणूक काळात वंचित बहुजन आघाडीचाही बोलबाला राहणार असून, ही आघाडी चुरशीची लढत देण्याची शक्यता आहे. विशेषत: भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात मुस्लिम व बहुजन मते लक्षणीय असल्याने हा मुद्दा निश्चितच महत्त्वाचा आहे.१ एमआयएममधून शहराध्यक्ष शादाब उस्मानी यांनी विधानसभा निवडणुकीची तय्यारी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाल्यास काँग्रेस आपल्या पदरात हा मतदारसंघ पाडून घेण्याच्या तयारीत आहेत. आघाडीतून भिवंडी पूर्वमधून काँग्रेसला उमेदवारी मिळणार असल्याची आशा असल्याने, काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी आपली इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यास माजी आमदार योगेश पाटील यांच्यासह अरु ण राऊत, तारिक फारु की, प्रशांत लाड यांच्यासह इतरही उमेदवार इच्छुक आहेत.२ समाजवादी पक्षाचे रिजवान मिस्टर हेदेखील समाजवादीतून पूर्वची निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. रिझवान मिस्टर हे समाजवादीचे प्रदेश महासचिव असल्याने समाजवादीची उमेदवारी आपल्या पदरात पडून घेण्यासाठी ते पक्षश्रेष्ठींकडे निश्चितच प्रयत्न करतील. मात्र, खरी लढत ही शिवसेना-भाजप-काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीत होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यातही विद्यमान आमदार रूपेश म्हात्रे व संतोष शेट्टी यांच्यात खरी लढत होणार असल्याची चर्चा सद्य:स्थितीत राजकीय वर्तुळात सुरू आहे.३ सत्तीसमीकरण जुळले आणि महाराष्ट्रात शिवसेना पुन्हा सत्तारुढ झाली, तर नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा अनेक आमदारांना आहे. भिवंडी पूर्वचे आमदार रुपेश म्हात्रे हेदेखील त्यांच्यापैकी एक आहेत. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी व आमदारकीची हॅट्ट्रिक मारून सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी आमदार रूपेश म्हात्रे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्या या इच्छांवर पाणी फेरण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्यक्ष मैदानात कोण बाजी मारेल, हे येणाºया काळात स्पष्ट होणारच आहे.