विरोधी पक्षनेतेपदावरील भाजपचा दावा फेटाळला, शिवसेनेच्या खेळीमुळे भंगले पहारेकऱ्यांचे स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 05:37 AM2020-03-06T05:37:56+5:302020-03-06T05:38:49+5:30
शिवसेनेच्या या खेळीमुळे नाराज भाजपच्या नगरसेवकांनी पालिका सभागृहाबाहेरच ठिय्या आंदोलन करीत महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबई : महापालिकेत दुसरा मोठा पक्ष असताना गेली दोन वर्षे पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असलेल्या भाजपने आता विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मात्र विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती यापूर्वीच झाली असल्याने त्या पदासाठी नवीन नेत्याची निवड होऊ शकत नाही, असा युक्तिवाद करीत त्यांचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी फेटाळला. शिवसेनेच्या या खेळीमुळे नाराज भाजपच्या नगरसेवकांनी पालिका सभागृहाबाहेरच ठिय्या आंदोलन करीत महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.
२०१७ मध्ये स्वबळावर पालिका निवडणूक लढविणाºया भाजपचे ८३ नगरसेवक निवडून आले होते. मात्र सत्तेच्या रस्सीखेचात शिवसेनेने बाजी मारल्यामुळे भाजपने विरोधी पक्षनेते पद नाकारून पहारेकºयाची भूमिका स्वीकारली. त्यामुळे पालिकेतील विरोधी पक्षनेते पद तुलनेने कमी म्हणजे केवळ २८ संख्याबळ असलेल्या काँग्रेसकडे गेले. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालिकेतील गणिते बदलली. त्यात गटनेते मनोज कोटक खासदारपदी निवडून आल्यामुळे भाजपने पालिकेतील आपल्या नेतृत्वात बदल केला.
पक्षाचे नवीन गटनेते म्हणून प्रभाकर शिंदे यांची नियुक्ती करण्याचे पत्र भाजपने महापौरांना पाठविले होते. त्यानुसार गुरुवारी महासभेत शिंदे यांना भाजप गटनेते म्हणून जाहीर करण्यात आले. मात्र विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा २०१७ मध्येच केल्याचे
स्पष्ट करीत भाजपचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा महापौरांनी फेटाळला.
पालिकेत शिवसेनेने खेळलेल्या या खेळीमुळे संतप्त भाजप नगरसेवकांनी हरकतीचा मुद्दा मांडून चर्चेची मागणी केली. त्याकडे महापौरांनी दुर्लक्ष करून सभागृहातील गदारोळातच कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला.
>काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या निर्णयाचे स्वागत
पालिका महासभेत बोलण्याची संधी न मिळाल्यामुळे भाजप नगरसेवकांनी सभात्याग करीत सभागृहाबाहेर ठिय्या मांडला. ‘महापौर हाय हाय’, ‘कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’, ‘विरोधी पक्षनेते पद आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा जोरदार घोषणा देऊन पालिका दणाणून सोडली. त्याचवेळी विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या निर्णयाचे स्वागत करीत ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.
>नियम काय सांगतो?
पालिकेत विरोधी पक्षनेते पद २०१७ मध्ये जाहीर झाले. या पदावर काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेते पद सोडल्यानंतरच भाजपला त्यासाठी दावा करता येईल. या नियमाचा आधार घेत शिवसेनेने भाजपची कोंडी केली आहे.
>लोकशाहीची हत्या
भाजप पालिकेतील दुसºया क्रमांकाचा पक्ष असल्याने आम्हाला विरोधी पक्षनेते पद मिळावे असा दावा केला होता. मात्र महापौरांनी तो फेटाळला. आम्ही हरकतीचा मुद्दा मांडून लोकशाहीच्या मार्गानुसार यावर चर्चेची मागणी केली. मात्र चर्चा करू दिली नाही. त्यामुळे महापौरांनी लोकशाहीची हत्या केली आहे. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळायला हवे. त्यासाठी वेळ आली तर न्यायालयातही दाद मागितली जाईल.
- प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते