Join us

विरोधकांसह सेनेच्या मतदारसंघात आता भाजपाचे ‘संपर्क आमदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 2:21 AM

काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेकडे असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपाने शनिवारी संपर्क आमदारांची नियुक्ती केली. विरोधकांच्या मतदारसंघात भाजपाला ताकद देण्याची जबाबदारी या आमदारांवर सोपविण्यात आली आहे.

- विशेष प्रतिनिधी ।मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेकडे असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपाने शनिवारी संपर्क आमदारांची नियुक्ती केली. विरोधकांच्या मतदारसंघात भाजपाला ताकद देण्याची जबाबदारी या आमदारांवर सोपविण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुख्य उपस्थितीत शनिवारी उत्तनमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजपाच्या आमदार, खासदारांचा वर्ग झाला. त्यावेळी आमदारांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. भाजपाचा आमदार नसलेल्या मतदारसंघांमध्ये जाऊन हे संपर्क आमदार आपल्या मतदारसंघाप्रमाणेच तळमळीने काम करतील, असे निर्देश त्यांना देण्यात आले.भाजपा आमदारांच्या भाजपेतर मतदारसंघांमधील या ‘घुसखोरी’मुळे नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटण्याचीही शक्यता आहे. प्रत्येक आमदारास नेमून दिलेल्या मतदारसंघात महिन्यातून किमानदोन वेळा जाणे अनिवार्य असेल. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊनच काम करा,असे आमदारांना सांगण्यातआले.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा काही महिन्यांपूर्वी तीन दिवस मुंबईत तळ ठोकून होते तेव्हा त्यांनी आमदारांसाठी पक्षविस्ताराच्या दृष्टीने कार्यक्रम दिला. त्यात ८१ मुद्यांचा समावेश होता. त्याचा आढावा या वर्गात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.पक्षसंघटना मजबूत करतानाच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी झोकून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक रविवारी म्हाळगी प्रबोधिनीत होणारआहे.खा. नाना पटोले अनुपस्थितअलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोेले आजच्या वर्गाला अनुपस्थित होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघामधील पूर्वनियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक असल्याने मी म्हाळगी प्रबोधिनीतील बैठकीला जाऊ शकलो नाही. पटोेले यांच्याशिवाय काही आमदार, खासदारांनी बैठकीला पाठ दाखविल्याची माहिती आहे.