Join us

तलासरीत भाजपा माकपाची मोर्चेबांधणी

By admin | Published: January 12, 2015 10:32 PM

हा तालुका आदिवासी असल्यामुळे सर्व गट व गण हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.

वसई : पालघर हा नवीन जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर बरखास्त झालेल्या ठाणे जिल्ह्यात तलासरी येथे तलासरी, वेवजी व उपलाट असे ३ गट व कोचाई-बोरमाळ, तलासरी, झरी, उधवा, डोंगारी व गिरगाव असे ६ गण होते. यंदा गटांमध्ये २ ने तर गणांमध्ये ४ ने वाढ होऊन एकूण ५ गट व १० गण निर्माण झाले आहेत. हा तालुका आदिवासी असल्यामुळे सर्व गट व गण हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मार्क्स. कम्यु. पक्ष व भारतीय जनता पक्ष या दोनच पक्षांना चांगली कामगिरी करता आली. राष्ट्रवादी, काँग्रेस व सेनेला या तालुक्यात खातेही उघडता आले नाही. ३ पैकी २ गट माकपाकडे तर १ गट भाजपाकडे, एकूण ६ गणांपैकी ५ गण माकपाकडे तर १ गण भाजपाकडे असे बलाबल निर्माण झाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मार्क्स. कम्यु. पक्षाचा पराभव केल्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपा सरस कामगिरी करील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तलासरी तालुक्यावर एकेकाळी मार्क्स. कम्यु.चे वर्चस्व होते. त्यास गेल्या विधानसभा निवडणुकीत तडा गेला. अंतर्गत मतभेदाने पोखरलेल्या मार्क्स. कम्यु. पक्षाला बंडाळीचा चांगलाच फटका बसला. अपेक्षा नसतानाही भाजपाचे पास्कल धनारे प्रचंड मतांनी निवडून आले. त्यामुळे भाजपाच्या गोटामध्ये यंदा आनंदाचे वातावरण आहे. कोणत्याही परिस्थितीत तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या जिंकायच्याच, अशा निर्णयाप्रत जिल्हास्तरावरील नेते आले आहेत. त्यादृष्टीने भाजपाचे वरिष्ठ नेते कामालाही लागले आहेत. काँग्रेस पक्षामध्ये सध्या बेदिलीचे वातावरण असून अनेक नेत्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे सादर केले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवेल, अशी शक्यता नाही.