Join us

प्रकाश आंबेडकरांच्या कृतीवर भाजपची टीका; शिवसेना-काँग्रेसची संयमी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 12:21 PM

सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर बुधवारी वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीतील जाहीर सभेतील व्यासपीठावर टिपू सुलतान यांच्या फोटोस पुष्पहार घातला. त्यानंतर, सोशल मीडियातून त्यांचा हा व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी सभेत बोलताना थेट पोलिसांना इशारा दिला. कारण, येथे व्यासपीठावर टिपू सुलतान यांचा फोटो वापरण्यास विरोध केल्यावरुनही पोलीस व सरकारवर जोरदार प्रहार केला होता. त्यानंतर, विरोधकांनी आंबेडकर यांच्या भूमिकेवर टीका केली. तर, काँग्रेस व शिवसेनेनं सावध पवित्रा घेतल्याचं दिसून आलं.   

सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर बुधवारी वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली. यावेळी आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करताना, धार्मिक मुद्द्यावरही भाष्य केले. व्यासपीठावर टिपू सुलतान यांचा फोटो ठेवण्यात आला होता. त्या, फोटोस पुष्पहार घालून त्यांनी भाषणातून पोलिसांना इशाराच दिला. त्यानंतर, सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकरांचे हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावरुन, भाजपने प्रकाश आंबेडकरांवर पलटवार केला आहे. तर, काँग्रेस व शिवसेनेनं सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 

भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इस्लामबद्दलचे मत काय होते ते वाचावे, असे म्हटले. तसेच, मी त्यांना एक पुस्तक पाठवतो, त्यात डॉ. बाबासाहेबांनी इस्लाम धर्माविषयी जे लिहिलंय ते प्रकाश आंबेडकर यांनी वाचावे, असे नितेश राणेंनी म्हटले. तर, यावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही, वेळ आल्यावर बोलू असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विषय टाळला. तर, मी त्यांना हार घालताा पाहिलं नाही, मी त्यांचा फोटोही पाहिला नाही. मात्र, मीडियाने मुलभूत प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या बातम्यांपेक्षा इतरही प्रश्न महाराष्ट्रापुढे आहेत, असे म्हणत काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही बोलणे टाळले.    

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर

टीपू सुलतान यांचा फोटो वापरु नये, तसेच त्या फोटोला हार घालू नये, असे पोलिसांकडून सभेच्या संयोजकांना सांगण्यात आले होते. मात्र, आंबेडकरांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. टिपू सुलतान जयंतीबाबत मज्जाव करणाऱ्या पोलिसांनी हिमत असेल तर कारवाई करून दाखवावीच, असे आव्हान यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पोलिसांनी दिले. तसेच, तुम्हाला सत्तेनुसार आणि कायद्यानुसार वागायचे असते. आत्तापर्यंत आम्ही निवडणुकांतून थेट सत्तेत कधीच प्रवेश केला नाही. मात्र, आता आम्ही सत्तेत असणार आहोत, असेही आंबेडकर यांनी म्हटले.  

टॅग्स :संजय राऊतप्रकाश आंबेडकरसांगलीकाँग्रेसशिवसेना