मुंबई- भाजप सरकारने सुरू केलेली आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जिचे आता 'मोदीकेयर' नावाने नामकरण करण्यात आलेले आहे, ती आगामी निवडणुकांमध्ये जनतेला मूर्ख बनवून मते मिळवण्यासाठी तयार केलेले मृगजळ आहे. मते मिळविण्यासाठी नरेंद्र मोदी किती खालच्या पातळीचे राजकारण करू शकतात हेच यावरून दिसून आले, अशा कठोर शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार यांच्यावर जोरदार टीका केली.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने जी अट ठेवली आहे, त्यानुसार ज्या लोकांच्या घरात फ्रिज किंवा मोटारसायकल आहे किंवा ज्या परिवारांचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आज फ्रिज किंवा मोटारसायकल आज देशातील सर्व कुटुंबांची मूलभूत गरज झालेली आहे. तरीसुद्धा 'मोदीकेयर' योजनेसाठी असे पात्रता निकष लावण्यामागचे कारण एकच आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मोदीकेयर' च्या नावाखाली जनतेला मूर्ख बनवून जनतेची मते घेऊ पाहत आहेत.गरिबांची मते मिळवण्यासाठी केलेले हे अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. ही देशातील गरीब जनतेची आणि त्यांच्या गरिबीची केलेली क्रूर थट्टा आहे. संजय निरुपम पुढे म्हणाले की, 'मोदीकेयर' या योजनेसाठी जे पात्रतेचे निकष आहेत, पूर्णतः चुकीचे आहेत. सुरुवातीला भाजप सरकारतर्फे घोषणा करण्यात आली होती की, या योजनेंतर्गत देशातील 50 करोड नागरिक आणि 10.74 करोड कुटुंबे, ज्यांना 2011 च्या सामाजिक आर्थिक वर्ग आणि जाति जनगणना (एसईसीसी) मध्ये 'वंचित' म्हणून वर्गीकृत केलेले आहे. अशा कुटुंबांना हॉस्पिटल्समध्ये 5 लाख रुपयांपर्यंत कॅश लेस इलाज दिला जाईल. पण आज सरकारने या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जे पात्रतेचे निकष ठेवले आहेत. ते सरकारने केलेल्या घोषणेशी मेळ खात नाही.
''मोदीकेयर हे जनतेला मूर्ख बनवून मतांसाठी भाजपाने तयार केलेले मृगजळ''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 6:50 PM