मुंबई : शरद पवार असोत वा कोणीही, सगळीकडे लढता त्याच त्वेषाने लढा, असा आदेश भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना दिला आहे. पवार यांनी माढा मतदारसंघातून लढण्याचे जाहीर केले आहे. पवार रिंगणात नसते तर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपाने केली होती. तथापि, आता शिंदे हे पवारांसोबत गेल्याने पवारांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार देण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे नाव या संदर्भात असले तरी ते पवारांविरुद्ध तेवढ्या जोमाने लढून आव्हान उभे करू शकतील का या बाबत साशंकता आहे. त्या ऐवजी माढाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते यांना पक्षात आणून उमेदवारी द्यावी का, यावर भाजपात खल सुरू आहे. अर्थात रणजितसिंह यांच्याशी अद्याप संपर्क साधण्यात आलेला नाही. आम्ही त्यांच्या नावाचा विचार करीत आहोत, असे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मोहिते पिता-पुत्र गुरुवारी पवारांच्या दौऱ्यात होते.सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खा. उदयनराजे भोसले यांना आव्हान देण्यासाठी भाजपाकडून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना मैदानात उतरविले जावू शकते. ही जागा गेल्यावेळी रिपाइंकडे होती. ती स्वत:कडे घेऊन लढत प्रतिष्ठेची करण्याची तयारी भाजपाने केली आहे.एकत्रित निवडणुकीची चर्चालोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे होणार असल्याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे. भाजपा-शिवसेना युतीच्या चर्चेत एकत्रित निवडणुकीची चाचपणी करण्याचे ठरले आहे, असे शिवसेनेचे काही आमदार सांगत आहेत. अर्थात या वृत्तास अधिकृत दुजोरा मिळाला नाही.