वक्फ बोर्डच्या निवडणुकीत भाजपाची गोची!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 06:05 AM2019-01-20T06:05:22+5:302019-01-20T06:05:28+5:30
केंद्रात व राज्यात सत्तेवर आल्यापासून प्रत्येक लहान-मोठ्या निवडणुकीत वरचष्मा गाजविणाऱ्या भाजपाची महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत मात्र गोची झाली आहे.
- जमीर काझी
मुंबई : केंद्रात व राज्यात सत्तेवर आल्यापासून प्रत्येक लहान-मोठ्या निवडणुकीत वरचष्मा गाजविणाऱ्या भाजपाची महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत मात्र गोची झाली आहे. विधिमंडळातील मुस्लीम आमदारांतून सदस्य निवडण्यात येणार आहे. मात्र दोन्ही सभागृहांत भाजपाचा एकही मुस्लीम सदस्य नसल्याने त्यांना सहभागच घेता येणार नाही.
राष्टÑवादीचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुरानी यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरला. महिलांसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी कॉँग्रेसच्या विधान परिषद सदस्या हुस्ना बानो कुरेशी या एकमेव महिला आमदार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचे जवळपास निश्चित आहे. दुरानी हे वक्फ बोर्डाचे विद्यमान सदस्य असून दुसºयांदा पक्षाने त्यांना संधी दिली आहे.
राज्यातील विविध ठिकाणची शेकडो एकर अतिक्रमित जागा, प्रलंबित खटले, अध्यक्षावरील भ्रष्टाचाराचा आरोप आणि सरकारचे दुर्लक्ष या बाबीमुळे महाराष्टÑ वक्फ बोर्ड वादातच राहिले आहे. औरंगाबादेत मुख्यालय असलेल्या या मंडळात एकूण बारा सदस्य संख्या असून त्यापैकी दोन जागा या विधिमंडळातील आमदारांसाठीच्या आहेत. त्यापैकी एक जागा महिलांसाठी राखीव असून या दोन जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख २१ जानेवारी असून दोनपेक्षा अधिक अर्ज आल्यास ४ फेबु्रवारीला मतदान होतील.
‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत केंद्रात व राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपाकडे मुस्लीम कार्यकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत राहिली आहे. त्यापैकी काहींना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, राज्य अल्पसंख्याक आयोग व वक्फ बोर्डच्या सदस्य पदावर नियुक्ती करून पक्ष सर्वसमावेशक असल्याचा संदेश दिला आहे. मात्र ‘वक्फ’मधील आमदार सदस्याच्या निवडणुकीसाठी विधानसभा, विधान परिषदेत एकही सदस्य नसल्याने त्यांना या निवडणुकीत सहभागीच होता येणार नाही.
>अशी आहे महाराष्टÑ वक्फ बोर्डची रचना
महाराष्टÑ वक्फ बोर्डात पूर्वी ११ सदस्य होते. मात्र या वेळेपासून मुस्लीम महिला आमदारासाठी एक जागा वाढविण्यात आली आहे.
याशिवाय खासदार, मौलाना, मुतवल्ली व शिया समाजातून एक प्रतिनिधी निवडला जातो. उर्वरित सदस्य ट्रस्टच्या व मुस्लीम सामाजिक कार्यकर्त्यांतून निवडला जातो. या नियमानुसार भाजपाने झाकीर कुरेशी, अॅड. बाबू कुरेशी व नागपुरातील आसिफ कुरेशी या कार्यकर्त्यांची निवड केली आहे.
>कागदोपत्री शेख हेच अध्यक्ष
वक्फ बोर्डाचे चेअरमन एम. ए. शेख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर दीड वर्षापूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र राज्य सरकारकडून आजतागायत तो मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कागदोपत्री शेख हेच अध्यक्ष आहेत.
>आमदारकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी
भाजपामध्ये मुस्लीम कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याने अनेकांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळावी किंवा विधान परिषदेत संधी द्यावी, अशी इच्छा बाळगून आहेत. माजी आमदार पाशा पटेल, मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष व मुंबईच्या भाजपा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हैदर आजम, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख हे पक्षातील मुस्लीम समाजातील वरच्या फळीतील कार्यकर्ते मानले जातात.