सरकारच्या विकासकामांमुळेच नेत्यांचा भाजप प्रवेश - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 05:34 AM2019-07-30T05:34:26+5:302019-07-30T05:34:34+5:30
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले,
मुंबई : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्यात केलेल्या विकासकामांमुळे जनतेत भाजपविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच अन्य पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केला.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र ३४ लाख हेक्टरवरून ४० लाख हेक्टर झाले. अशाच प्रकारे विविध क्षेत्रांत विकास झाला. शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांचा अनुभव सामान्य माणूस घेत आहे. परिणामी, तेथील लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये प्रवेश करावा असे वाटते. आगामी पंधरा वर्षे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही. आपल्या भागाच्या विकासासाठी नेत्यांना इकडे यावेसे वाटते. भाजपमध्ये घाणेरडे राजकारण होत नाही, याची अन्य पक्षांतील नेत्यांना जाणीव झाली आहे, असे पाटील म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री व माजी राज्यपाल राम नाईक पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील. नाईक यांनी पाच वर्षांपूर्वी राज्यपालपदी नियुक्ती होत असताना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.