सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 12:58 AM2019-08-04T00:58:16+5:302019-08-04T00:58:40+5:30
सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भांडुपमध्ये भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे
- मनीषा म्हात्रे
मुंबई : शिवसेनेमध्ये असलेल्या अंतर्गत युद्धाबरोबरच लोकसभेतील विजयानंतर भांडुपमधील भाजप उमेदवारांच्या आशाही उमेदवारीसाठी पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भांडुपमध्ये भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर मनसे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि वंचितच्या उमेदवारांनीही स्थानिक पातळीवर काम सुरू केल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
भांडुप ही कुशल, अकुशल औद्योगिक कामगारांची वस्ती. लालबहाद्दूर शास्त्री मार्गावरील औद्योगिक पट्ट्यात हातावर पोट असलेल्या श्रमिक वर्गाने जागा मिळेल तिथे वस्ती वसवली. मधल्या काळात येथील एपीआय, जीकेडब्ल्यू आणि अन्य बंद पडलेल्या कंपन्यांच्या मोकळ्या जागेत गगनचुंबी गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. तेथे राहण्यासाठी आलेले लोक बहुभाषिक आहेत. मात्र आजही एकूण विचार करता भांडुपमध्ये मराठी आणि त्यातही कोकणाशी संबंध सांगणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याच जोरावर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख झाली. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या या प्रमुख ठाण्याला २००९ मध्ये खिंडार पाडले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मनसेच्या शिशिर शिंदे यांनी १.९५ लाख मते घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे संजय पाटील यांचा विजय झाला. सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतील भांडुपसह विक्रोळी, घाटकोपर पश्चिम मतदारसंघ मनसेने काबीज केले. त्यानंतर मनसेची हळूहळू पिछेहाट सुरू झाली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात मनोज कोटक यांनी सव्वादोन लाखांच्या फरकाने विजय मिळवला. त्यात भांडुप विधानसभा मतदारसंघामधून त्यांना ९७ हजार ३५२ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांना या मतदारसंघामधून ५१ हजार ४०३ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या निहारीका खोंदले यांनीदेखील ९ हजार ३८६ मते मिळवली.
भांडुपचे रहिवासी असलेल्या पाटील यांना भांडुप विधानसभा हा नेहमीच डेंजर झोन ठरत आला आहे. तर सेनेच्या पाठिंब्याने भाजपचे कोटक यांनी येथे बाजी मारली आहे. गेल्या आमदारकीच्या निवडणुकीतही कोटक यांनी सेनेचे विद्यमान आमदार यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्यातच या वेळी सेनेचे रमेश कोरगावकर यांनी पाटील यांच्या उमेदवारीला चॅलेंज केले आहे.
सध्या भांडुपमध्ये सेनेचे ४, भाजपचे २ आणि काँग्रेसचे १ असे महापालिकेत पक्षीय बलाबल आहे. त्यातही सेना-भाजप वेगळे लढले किंवा जागांची अदलाबदल झाली, तर भाजपकडून दीपक दळवी, जितू घाडीगावकर, कौशिक पाटील, मंगेश पवार हे इच्छुक आहेत. त्यामुळे सेना- भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
वंचितच्या उमेदवाराचा चेहरा अस्पष्ट
मनसेकडून संदीप जळगावकर आणि माजी नगरसेविका अनिषा माजगावकर रिंगणात उतरू शकतात. आघाडीसोबत मनसे गेली तरीही मनसे ही जागा मागू शकते. मात्र, गेल्या काही वर्षांतील मनसेच्या कमी होत गेलेल्या प्रभावामुळे त्यांना किती पाठिंबा मिळेल हे मतांमधूनच समजेल. काँग्रेसकडून नगरसेवक सुरेश कोपरकर यांना संधी दिली जाऊ शकते. वंचितच्या उमेदवाराचा चेहरा अद्याप अस्पष्ट आहे.