बंडखोरांमुळे वाढली भाजपाची डोकेदुखी; अनेकजण खडसे आणि तावडेंच्या संपर्कात असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 01:05 PM2019-12-03T13:05:07+5:302019-12-03T13:06:06+5:30
महाविकास आघाडीमुळे भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाला फटका बसण्याची स्थिती आहे.
मुंबई - भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे सर्वत्र पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच भाजपाचे काही बंडखोर नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे या नेत्यांच्या संपर्कात असून वेगळा विचार करण्यासाठी दबाव टाकत असल्याची माहिती मिळाली आहे. हे बंडखोर नेते यंदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आहेत.
एबीपी माझा यांनी दिलेल्या वृत्तानुसार निवडणुकीपूर्वी भाजपा नेत्यांमध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांना तिकीट नाकारण्यात आलं. युती झाल्यामुळे अनेक ठिकाणी भाजपा नेत्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविली होती. यांना निवडणुकीत ३० हजार ते ९० हजार पर्यंत मतं मिळाली होती. सध्या भाजपाला विरोधात बसावं लागत असल्याने हे बंडखोर अस्वस्थ आहेत.
महाविकास आघाडीमुळे भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाला फटका बसण्याची स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीसाठी वेगळी समीकरणं करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून ११ ते १२ बंडखोर उमेदवार विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंच्या संपर्कात आहेत. या दोन्ही नेत्यांनी विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे या बंडखोर उमेदवारांची समजूत खडसे आणि तावडे यांना काढावी लागणार आहे.
सत्ता गेल्यानंतर भाजपामध्ये काही गट नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट या नाराजीतूनच समोर आली असल्याचं बोललं जातंय. १२ डिसेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर लोकांना येण्याचं आवाहन केलं आहे. पण त्याचसोबत पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? हे ठरवूया असं सांगितल्याने पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार का असा सवाल उपस्थित झाला. पण पंकजा मुंडे भाजपातच राहणार असून त्यांच्याबद्दल बातम्या पसरवू नका असं भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ खडसेंनीही काही दिवसांपूर्वी राज्यातील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांची पोस्ट या एकंदर घटना पाहिल्या तर राज्यात सत्ता गेल्यानंतर भाजपाला बंडखोरी आणि गटबाजीचा फटका बसू नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.