"अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 04:59 PM2020-04-26T16:59:13+5:302020-04-26T17:02:31+5:30
"राजभवनाच्या भिंतीवर डोके फोडले तरी २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील."
मुंबई : एकीकडे कोरोना व्हायरसने थैमान घातले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे.
राजभवनाच्या भिंतीवर डोके फोडले तरी २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला होता. याला उत्तर देताना भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
आशिष शेलार म्हणाले, "कोरोनाच्या या युद्धात मा. राज्यपालांवर अनाठायी राजकीय टीका करणे पत्रपंडितांच्या अंगाशी आले. ...पक्षाच्या नेत्यांना राजभवनावर धावाधाव करावी लागली. म्हणून पत्रपंडितांनी आज "रोखठोक" मध्ये "टिक टॉक" करुन आता स्वतःच्या अंगाशी आलेले झटकण्याची केविलवाणी धडपड केली."
कोरोनाच्या या युध्दात मा. राज्यपालांवर अनाठायी राजकीय टीका करणे पत्रपंडितांच्या अंगाशी आले. ...पक्षाच्या नेत्यांना राजभवनावर धावाधाव करावी लागली. म्हणून पत्रपंडितांनी आज "रोखठोक" मध्ये "टिक टॉक" करुन आता स्वतःच्या अंगाशी आलेले झटकण्याची केविलवाणी धडपड केली. (1/2)
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 26, 2020
याचबरोबर, दुसरे ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले, "अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?कृष्णकुंजमुळे मातोश्रीवर पोहोचले... मातोश्रीमुळे संसदेत पोहोचले... पण पत्रपंडित हो, इतिहास विचारु शकतो तुम्हाला...महोदय, का या सगळ्यांना विसरुन तुम्ही नेहमीच "सिल्वरओक" कडे झुकले?"
(2/2) अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 26, 2020
कृष्णकुंज मुळे मातोश्रीवर पोहचले... मातोश्रीमुळे संसदेत पोहचले... पण पत्रपंडित हो, इतिहास विचारु शकतो तुम्हाला...
महोदय, का या सगळ्यांना विसरुन तुम्ही नेहमीच "सिल्वरओक" कडे झुकले?
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नामनियुक्त विधान परिषद सदस्यतेबाबत राज्यपालांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या. पण घटना आणि कायद्याची चौकट कोणालाच मोडता येणार नाही. ‘राजभवनाच्या भिंतीवर डोके आपटून कपाळ फुटेल, पण उद्धव ठाकरे यांचे सरकार पडणार नाही. ही रायगडावरील काळ्या दगडावरची रेघ समजा,’ २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून भाजपावर निशाणा साधला होता.
याशिवाय, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते आणि संघ प्रचारक आहेत. पण आज ते फक्त राज्यपाल आहेत. विरोधी पक्षाचे नेते राजभवनात उठसूठ जातात आणि राज्यपाल हे फक्त भाजपाचेच नेते आहेत अशा आविर्भावात भेटतात. त्यामुळे राज्यपालांची प्रतिमा खराब होत आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते.