सत्ता गेल्याने भाजपाला मानसिक धक्का, त्यांना काऊंसिलिंगची गरज; संजय राऊतांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 02:47 PM2020-01-05T14:47:53+5:302020-01-05T14:50:07+5:30
अनेक ऑपरेशन करून आमचे हात अनुभवी झाले आहेत.सर्वाच जास्त चिरफाड आम्हीच करतो
मुंबई - महाराष्ट्रात ऑपरेशन लोट्सची मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपावरशिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे. हाती 105 आमदार असतानाही सत्ता गेल्याने भाजपाला धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे. सत्ता गेल्याने भाजपाचे नेते काहीही बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी समुपदेशनाची गरज आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच भाजपाच्या ऑपरेशन लोटसकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो. आमचे मासे त्यांच्या गळाला लागणार नाहीत. तसेच आमच्या उसाला त्यांचा कोल्हा लागणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
अब्दुल सत्तार यांच्या नाराजीनंतर भाजपा नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पुढच्या काही काळात कोसळेल, असे सांगत ऑपरेशन लोटस सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यावरून संजय राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत भाजपा नेत्यांना कुणाचेही नाव न घेता टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ''भाजपाच्या ऑपरेशन लोटसकडे मनोरंजन म्हणून पाहतो. त्यातून राज्याचे टॅक्स फ्री मनोरंजन होत आहे. त्याचा काही परिणाम होणार नाही. लोटस बिटस काही नाही आम्हीही ऑपरेशन करतो. अशी अनेक ऑपरेशन करून आमचे हात अनुभवी झाले आहेत.सर्वाच जास्त चिरफाड आम्हीच करतो,'' असा इशारा राऊत यांनी दिला.'' भाजपाने ऑपरेशन लोटससाठी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. आमचे मासे त्यांच्या गळाला लागणार नाहीत. आमच्या उसाला त्यांचा कोल्हा लागणार नाही,''असा टोलाही राऊत यांनी लगावला.
''भाजपवाल्यांनी डोळे मिटले की त्यांची सत्ता येते आणि डोळे उघडले की सत्ता जाते. भाजपाला सत्तेचा स्वप्नदोष झाला आहे. हाती 105 आमदार असतानाही सत्ता गेल्याने भाजपाला धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे. सत्ता गेल्याने भाजपाचे नेते काहीही बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी समुपदेशनाची गरज आहे. मी या संदर्भात आरोग्य मंत्रांना माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांकडे एक अहवाल सादर करण्यास सांगणार आहे.''अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.