वीज कंपन्यांविरोधात भाजपचे टाळे ठोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:09 AM2021-02-06T04:09:30+5:302021-02-06T04:09:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटीस पाठविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ शुक्रवारी मुंबईत ...

BJP's lockout agitation against power companies | वीज कंपन्यांविरोधात भाजपचे टाळे ठोको आंदोलन

वीज कंपन्यांविरोधात भाजपचे टाळे ठोको आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटीस पाठविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ शुक्रवारी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. तसेच महावितरणसह वीज कंपन्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकत सरकारचा निषेध केला.

कोरोनाच्या संकट काळात महावितरणने वाढीव वीजबिल पाठवून जनतेला धक्का दिला. सुरुवातीला वीजबिलात सवलत देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने आपला शब्द फिरवला. आता तर ७५ लाख सर्वसामान्य ग्राहकांकडे वसुलीसाठी तगादा लावला आहे. बिल न भरल्यास वीज तोडण्याची धमकी देत एकप्रकारे पठाणी वसुलीच महाआघाडी सरकार करत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. याविरोधात मुंबईत विविध लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात भाजपने निदर्शने केली. उत्तर मुंबईत भाजपने अदानी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.

अदानी वीज कंपनीच्या गेटवर घोषणाबाजी करण्यात आली. यावळी मुंबई प्रभारी अतुल भातखळकर, उत्तर मुंबई अध्यक्ष गणेश खणकर, आमदार भाई गिरकर, योगेश सागर, सुनील राणे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी भाजप शिष्टमंडळाने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिले.

तर, भाजप दक्षिण-मध्य मुंबईच्यावतीने महावितरणविरोधात ‘टाळे ठोको व हल्लाबोल’ आंदोलन केले. चार कोटी जनतेला अंधारात ढकलणाऱ्या सरकारला झटका दिल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, आमदार कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय, उत्तर-पूर्व मतदारसंघात खासदार मनोज कोटी, आमदार मिहीर कोटेचा यांच्या उपस्थितीत वीज जोडणी तोडणे व वाढीव वीजबिलांविरोधात ‘टाळे ठोको आंदोलन’ करण्यात आले.

Web Title: BJP's lockout agitation against power companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.