- अल्पेश करकरेमुंबई - मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सरास पाहायला मिळतात. त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांनी कोंडीत पकडत असतात. मात्र आता विरोधी पक्ष भाजपचे महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालय अनधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे. नरिमन पॉईंट येथे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय आहे. हे कार्यालय बेकायदेशीररीत्या बांधण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्यालय अनधिकृत असल्याने त्यावर मुंबई महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास पालिकेत आंदोलन करू असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.
मंत्रालयाजवळ भारतीय जनता पक्षाचे कार्यालय आहे. हे कार्यालय बेकायदेशीर पणे उभारले असल्याने ते अनधिकृत आहे. त्यामुळे त्या कार्यालयावर कारवाई करून ते हटवावे अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. मुंबईत अनेक झोपड्यांवर कारवाई केली जाते मग भाजपाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई का केली जात नाही, भाजपाच्या अनधिकृत बांधकामाला पालिकेने संरक्षण दिले आहे का असा प्रश्नही कांबळे यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात भाजप नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भाजपाचे कार्यालय बेकायदेशीररीत्या बांधण्यात आले आहे. यामुळे त्यावर कारवाई करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना भीम आर्मीने पत्र दिले आहे. पालिकेने हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित तोडावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी दिली. तर प्रशादनाकडून भीम आर्मी पदाधिकारी यांना सोमवारी आयुक्त यांनी भेट देणार असल्याचे कळत आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी विरोधी पक्ष भाजप करत असताना आता त्यांचेच कार्यालय अनाधिकृत आहे, असं म्हणत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.