भाजपाचे पुरुष हैराण झालेत, आता...; महापौर किशोरी पेडणेकरांचा अमृता फडणवीसांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:34 PM2022-02-04T18:34:39+5:302022-02-04T18:35:28+5:30
थोडं सामान्य स्त्री म्हणून केंद्रातही बोला. राज्याला काय फायदा होतो त्यावरही बोलावं असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना लगावला.
मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या घटस्फोटाच्या विधानानंतर शिवसेनेनं खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील खड्ड्यांमुळे ३ टक्के घटस्फोट होतात. एक सामान्य स्त्री म्हणून मी हे बोलतेय असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) म्हणाल्या की, वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के घटस्फोट होतात हा जावईशोध कुठून लावला ते शोधलं पाहिजे. दरवेळी हे जावईशोध लावून आघाडी सरकारवर बोललं जातंय. ज्या प्रकारे महाराष्ट्रात बदल झालंय त्यामुळे भाजपाचे पुरुष खूप हैराण आहेत. त्यांच्या घरातील महिलांनाही इतका त्रास व्हायला लागला का? अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
तसेच सामान्य स्त्री म्हणून बोलते असं त्या म्हणाल्या. मग आम्ही कोणत्या भूमिकेत त्यांना बघायचं सामान्य स्त्री की माजी मुख्यमंत्र्यांची बायको असं विचारत असे जावईशोध करुन मुंबई आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु नये. थोडं सामान्य स्त्री म्हणून केंद्रातही बोला. राज्याला काय फायदा होतो त्यावरही बोलावं. जिथे प्रबोधन करायचे तिथे करा आणि मॉडेलिंग सिनेमा क्षेत्राबद्दल बोलणं ठीक आहे असा सल्लाही किशोरी पेडणेकरांनी अमृता फडणवीसांना दिला.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्याबाबत भाष्य करत शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. अमृता फडणवीस म्हणाल्या की, "तुम्ही हे विसरुन जा की मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आहे. जेव्हा मी काही बोलते तेव्हा मी सामान्य स्त्री म्हणून बोलते. मलाही रस्त्यांच्या खड्ड्यांचा किंवा इतर गोष्टींचा त्रास होतो. मी सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. आज मुंबईतील खड्ड्यांमुळे ट्राफिक जाम होतं आणि या ट्राफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात. कारण आज मुंबईकरांना कुटुंबीयांना वेळ देता येत नाही. यावर जर तुम्ही बोलणार नसाल तर काय कराल" असं विधान त्यांनी केले होते.