भाजपाचं मिशन १५०! शिवसेनेची डोकेदुखी वाढणार; मुंबईसाठी पक्षश्रेष्ठींचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 12:57 PM2022-08-16T12:57:10+5:302022-08-16T12:57:59+5:30

आशिष शेलार यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत ८२ जागा मिळवण्यात यश आले होते.

BJP's Mission 150 for BMC Election, Shiv Sena's headache will increase; Party leaders given target to ashish shelar | भाजपाचं मिशन १५०! शिवसेनेची डोकेदुखी वाढणार; मुंबईसाठी पक्षश्रेष्ठींचा प्लॅन

भाजपाचं मिशन १५०! शिवसेनेची डोकेदुखी वाढणार; मुंबईसाठी पक्षश्रेष्ठींचा प्लॅन

Next

मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं मिशन १५० टार्गेट ठरवण्यात आल्याची माहिती आहे. अलीकडेच आशिष शेलार यांनी दिल्लीवारी केली. त्यात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शेलारांना मुंबई महापालिकेत १५० भाजपा नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट देण्यात आले आहे. सध्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपानं मिशन हाती घेतले आहे. 

आशिष शेलार यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत ८२ जागा मिळवण्यात यश आले होते. शेलारांसारखा आक्रमक चेहरा जो शिवसेनेला टक्कर देऊ शकतो यासाठी सरकारमध्ये मंत्रिपद देण्याऐवजी शेलारांना पक्षसंघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपाची सत्ता आणण्याचं पक्षश्रेष्ठींनी ठरवलं आहे. तर दुसरीकडे पालिकेवरील सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे. 

मागील २५ वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई सर्वात श्रीमंत महापालिका आहे. या पालिकेच्या बळावरच शिवसेनेची आर्थिक ताकद आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने वेगवेगळ्या निवडणुका लढल्या होत्या. तेव्हा शिवसेनेचे भाजपाच्या तुलनेत केवळ २-३ नगरसेवक जास्त होते. त्यानंतर अपक्ष आणि मनसेचे नगरसेवक फोडून शिवसेनेने पालिकेतील संख्याबळ वाढवलं. मात्र त्यावेळी राज्यात एकत्र सत्तेत असल्याने भाजपाने पहारेकरीची भूमिका स्वीकारत शिवसेनेला सत्तेचा मार्ग मोकळा केला. 

परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सत्तासमीकरण बदलले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात शिवसेनेने महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले. मात्र अडीच वर्षात शिवसेनेत मोठी फूट पडल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील ४० आमदार, १२ खासदार यांच्यासह अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक सध्या शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर पक्षातील अंतर्गत नाराजी, शिंदे गटाचं वाढतं प्राबल्य आणि भाजपाची आक्रमक रणनीती यामुळे यंदा महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 
 

Web Title: BJP's Mission 150 for BMC Election, Shiv Sena's headache will increase; Party leaders given target to ashish shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.