भाजपचे मिशन मुंबई महापालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:13+5:302021-06-10T04:06:13+5:30
एकमेकांसोबत राहून काम करण्याचे नेत्यांना आवाहन गौरीशंकर घाळे मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी संघटनात्मक आढावा घेतला. पालिकेतील ...
एकमेकांसोबत राहून काम करण्याचे नेत्यांना आवाहन
गौरीशंकर घाळे
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी संघटनात्मक आढावा घेतला. पालिकेतील शिवसेनेच्या कारभारातील उणिवा, अकार्यक्षमता जनतेसमोर आणण्याचा निर्धार करतानाच नेते, पदाधिकाऱ्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले. हा भाग याचा की त्याचा करत बसू नका, एकजुटीने सोबत राहून काम करण्याची सूचना ज्येष्ठ नेत्यांनी केली.
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दादर येथील कार्यालयात भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रभारी अतुल भातखळकर, सुनील कर्जतकर यांच्यासह मुंबईतील खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल. संतोष हेसुद्धा आजच्या बैठकीस उपस्थित होते. त्यांनी मुंबईतील संघटनात्मक रचना, सेवाकार्यांचा आढावा घेतला. तसेच उपस्थित नेत्यांकडून सद्य:स्थितीचाही आढावा घेतला. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या कारभारातील उणिवांवर बोट ठेवायला हवे. पाच वर्षातील अकार्यक्षमता लोकांसमोर येईल, अशी रणनीती आखायला हवी. शिवसेनेच्या अपयशाचे हल्लाबोल करण्याचा निर्धारही आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
तसेच, पक्षाच्या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून सेवा ही संघटन या सूत्राचा अवलंब करण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारने सर्वांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. सर्वांना याचा लाभ घेता यावा, विशेषतः दुर्बल घटकांपर्यंत याचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणतानाच यासंदर्भातील अडीअडचणी सोडविण्यावर भर देण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय, २१ जून रोजी योग दिनाच्या कार्यक्रमांबाबतही चर्चा झाली. प्रामुख्याने संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली असली तरी राजकीय विषयही यावेळी निघाले. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा कारभार, त्यासंदर्भातील लोकभावना याचाही ऊहापोह झाला. याशिवाय, पक्षांतर्गत विषयांवर उपस्थितांनी भाष्य केले. तर, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने बैठकीचा समारोप झाला.