महिला अत्याचारांविरोधात भाजपचा शिवाजी पार्कात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:56 AM2020-10-13T01:56:42+5:302020-10-13T01:56:58+5:30
राज्यकर्ते अत्याचारांच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करेपर्यंत भाजप कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मालिका दिवसेंदिवस वाढतच आहेत. मात्र, या असंवेदनशील सरकारला याची तसूभरही चिंता नसल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी सोमवारी दादर येथील शिवाजी पार्क ते चैत्यभूमी मोर्चा काढला. राज्यातील महिला अत्याचारांच्या विरोधात भाजपने राज्यव्यापी आक्रोश आंदोलन छेडले आहे. याचाच भाग म्हणून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भाजपने मुंबईत मोर्चा काढला.
या मोर्चात खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, पराग अळवणी, प्रसाद लाड, सुनील राणे, तमिल सेल्वन, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर यांच्यासह चित्रा वाघ आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यातील माता-भगिनींचा आवाज कुंभकर्णरूपी झोपलेल्या ठाकरे सरकारपर्यंत पोहोचविणे आणि या सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. या सरकारला विद्यार्थ्यांची चिंता नाही, शेतकरी, श्रमिक, दलित, पीडित व्यक्तींची चिंता नाही. महिला अत्याचारांच्या घटना रोखल्या पाहिजेत आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन झालेच पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी या मोर्चाच्या वतीने केली आहे. राज्यकर्ते अत्याचारांच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करेपर्यंत भाजप कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.