मुंबई : काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक टिप्पणीविरोधात आज मुंबई भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. कामत यांच्या चेंबूर येथील घराबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या निदर्शकांनी त्यांच्या घराच्या नेमप्लेटला काळे फासून निषेध व्यक्त केला. मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा शलाका साळवी, युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी २च्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. ‘नारी के सम्मान में भाजपा मैदान में’, ‘गुरुदास कामत माफी मागा’, ‘कामत यांचा निषेध असो’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. जवळपास अर्धा तास भाजपा कार्यकर्त्यांनी कामत यांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या तमाशाला भीक घालणार नाही - गुरुदास कामत भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या घराबाहेर घातलेल्या तमाशाला आपण भीक घालणार नाही. कामत परिवार घरात नसताना भाजपा कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ अनाकलनीय असल्याची टीका काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी केली आहे. कोणतीही पात्रता नसताना मनुष्यबळ विकासासारखे महत्त्वाचे खाते स्मृती इराणी यांना देण्यात आले. स्मृती इराणींवरील आरोपांमुळे व्यथित झालेले भाजपा कार्यकर्ते परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरील टीकेबद्दल मौन बाळगून आहेत. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील इराणींचे महत्त्व जाणूनच भाजपा कार्यकते निदर्शने करीत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर स्टंटबाजी करण्याऐवजी भाजपाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. अन्यथा प्रत्येक भाजपा नेत्याच्या घराबाहेर काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही कामत यांनी या वेळी दिला.
कामतांच्या घराबाहेर भाजपाचे आंदोलन
By admin | Published: August 03, 2015 2:05 AM