Join us

भाजपाचे पालिका वॉर्ड मिशन १५०!

By admin | Published: May 13, 2016 2:58 AM

देशातील सर्वांत अधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेचे पडघम वाजणे सुरू झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालिका निवडणुकीचे बिगुल वाजविलेल्या

मनोहर कुंभेजकर,  मुंबईदेशातील सर्वांत अधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेचे पडघम वाजणे सुरू झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालिका निवडणुकीचे बिगुल वाजविलेल्या भाजपाने सध्या निवडणुकीसाठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. आगामी २०१७ ची पालिका निवडणूक स्वबळावर शिवसेना-भाजपा लढणार हे जणू आता निश्चित झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या पालिका निवडणुकीत सर्वांत जास्त जागा जिंकण्यासाठी मुंबई भाजपाने ‘पालिका वॉर्ड मिशन १५०’ ही रणनीती आखली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष-आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजपाने जोमाने पालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्या पालिकेत भाजपाचे २८ नगरसेवक असून, नुकतेच शेलार यांच्या उपस्थितीत अन्य पक्षाच्या तीन नगरसेवकांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे.या रणनीतीचा एक भाग म्हणून शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भाजपा सरचिटणीस अमरजित मिश्रा हे भाजपाच्या वॉर्ड अध्यक्षांच्या घरी वॉर्डमधील भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, आमदार यांना घेऊन जात आहेत. दहिसर वॉर्ड क्र.१ पासून त्यांनी ही मोहीम सुरू केली आहे. आत्तापर्यंत २२७ पैकी सुमारे भाजपाच्या ८० वॉर्ड अध्यक्षांच्या घरी त्यांनी भेटी दिल्या आहेत.भाजपाच्या वॉर्ड अध्यक्षांची विभागातील असलेली प्रतिमा, पालिका निवडणुकीत भाजपाचे विजयी मिशन कसे साध्य करायला हवे, विभागातील राजकीय बलाबल यांची माहिती ते संबंधित वॉर्ड अध्यक्षांकडून घेत आहेत. पालिका निवडणुकीला वेळ कमी असल्याने, वेळेच्या नियोजनासाठी भाजपाच्या वॉर्ड अध्यक्षाला एक कॅलेंडर, एक घड्याळ देण्यात येत आहे. मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षाचा दूत आपल्या घरी येत असल्याने, आपले मनोबल वाढत असल्याची भावना वॉर्ड अध्यक्षांकडून व्यक्त होत आहे. पक्ष जो सक्षम उमेदवार देणार, तो निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याची ठाम ग्वाही ते असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. भाजपाच्या या आक्रमक रणनीतीला शिवसेना कसे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.