भांडुपमधील भाजपाच्या वाचनालयामुळे नवा वाद?
By admin | Published: October 26, 2016 04:57 AM2016-10-26T04:57:25+5:302016-10-26T04:57:25+5:30
भांडुप पश्चिमेकडील कोकणनगर, खडी मशिन येथे रस्त्याच्या कडेला वाचनालय उभारण्याचा घाट भाजपा पदाधिकाऱ्यांनी घातला आहे. या वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
मुंबई : भांडुप पश्चिमेकडील कोकणनगर, खडी मशिन येथे रस्त्याच्या कडेला वाचनालय उभारण्याचा घाट भाजपा पदाधिकाऱ्यांनी घातला आहे. या वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. रस्त्याच्या कडेला उभारले जाणारे हे वाचनालय अनधिकृत असल्याचा दावा केला जात असल्यामुळे येत्या काळात सर्वपक्षीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
कोकणनगर परिसरात या ठिकाणी खडी बनविण्याची मशिन कार्यरत होती, म्हणून या भागाला खडी मशिन असे नाव पडले. हा प्रकल्प बंद झाल्यानंतर पालिकेने येथे रस्ता बांधल्याने या जागेचे दोन भाग झाले. ही मोक्याची जागा हेरून या ठिकाणी भाजपाने वाचनालय सुरू करण्याचा घाट घालत भूमिपूजन उरकून घेतले. याआधीच शिवाजी तलाव परिसरात शिवसेना आमदार अशोक पाटील यांनी निवारा शेड बांधली. ती अनधिकृत असल्याचा आरोप करत मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी कारवाईची मागणी केली आहे. हे वाचनालयही अनधिकृत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या वाचनालयावरून निवडणुकीच्या तोंडावर वाद पेटण्याची शक्यता आहे.
ज्या ठिकाणी हे वाचनालय बांधले जात आहे. तेथे कचरा फेकला जात होता. त्यामुळे हा भाग साफ करून रहिवाशांसाठीच वाचनालय उभारण्यात येत आहे. अन्य पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांनीही रस्त्याच्या कडेला फंडातून वाचनालये बांधून दिली आहेत. त्यामुळे या वाचनालयाविषयी त्यांनी बोलू नये, असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.