मुंबई: कमी आमदार असतानाही राज्यात सरकार कसे बनवले जाऊ शकते हे मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिकवले असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत बुधवारी व्यक्त केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
निलेश राणे उद्धव ठाकरेंवर टिका करणाऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हा माणूस स्वर्गीय बाळासाहेबांना विसरला. ज्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर शिवसैनिक घडवला त्यांचाच मुलगा त्यांना विसरुन रोज पवार साहेबांचे गुणगान गातोय. कारण सोपं आहे, पवार साहेब नसते कर हे मातोश्री बाहेर गोट्या खेळत बसले असते असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सभेच्या भाषणात शरद पवार तुम्हाला कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन द्यायला शिकवतात. त्याचप्रमाणे राजकारणात शरद पवार यांनी कमीत कमी आमदार असताना देखील राज्यात सरकार स्थापन करुन चमत्कार केला. त्यामुळे जागा जास्त असल्याने पिकं सगळीकडे येणार असं म्हणू नये असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच कमीत कमी जागेत सुद्धा तुमच्यावर मात करु शकतो आणि ते करुनही दाखवल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला होता.