मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. गेल्या २५ वर्षापासून पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. परंतु यंदा शिवसेनेच्या ताब्यातून BMC च्या तिजोरीच्या चाव्या काढून घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. त्यासाठी मुंबईतील मराठी मतदारांना आकर्षिक करण्यासाठी भाजपा विविध कार्यक्रम हाती घेत आहे. त्यात मराठी कट्टानंतर आता नवरात्रीत मराठी दांडिया महोत्सवाचं मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग, परळ, शिवडी या भागात भाजपानं शहीद भगतसिंग मैदान, अभुदय नगर काळाचौकी येथे मराठी दांडिया आयोजित केला आहे. याठिकाणी सगळीकडे भाजपाचे पोस्टर्स लागले आहे. मोठ्या प्रमाणात लोक या दांडियाला हजेरी लावत आहेत. याच दांडियामध्ये भाजपानं भन्नाट ऑफर ठेवली आहे. मराठमोळी वेशभूषा करा आणि दररोज जिंका २ आयफोन, याठिकाणी सर्वोकृष्ट वेशभूषेसाठी एक विजेता आणि एक विजेती यांना बक्षिस म्हणून iphone 11 देण्यात येत आहे. ३० सप्टेंबरपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून ४ ऑक्टोबरपर्यंत याठिकाणी मराठी दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई भाजपानं शहरात जवळपास ३०० ठिकाणी गरब्याचं आयोजन केले आहे. त्यासाठी विशेष पासची व्यवस्था असून भाजपाच्या कार्यालयात हे पास उपलब्ध करून देण्यात आले असून ते निशुल्क आहेत. भाजपाच्या मराठी दांडियाला प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांनी हजेरी लावली. अवधुत गुप्ते म्हणाले की, एक मराठी कलाकार म्हणून मला याचा आनंद आहे. एक हक्काचा दांडिया, मैदान मिळणं आणि त्यात गायला मिळणं ही मोठी संधी आहे. मी भाजपाचा आभारी आहे असं त्यांनी सांगितले.
मराठी दांडियावर शिवसेनेचं टीकास्त्रमुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे. शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही अशा शब्दात शिवसेनेने भाजपाच्या कार्यक्रमावर टीकास्त्र सोडलं आहे.
शिवसेनेच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तरज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली. अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले. ज्यांनी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सावाची धूम सुरू आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय. मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय त्यांना आमचा एकच सल्ला मग घ्या ना धौती योग असा मार्मिक टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावत मराठी दांडियावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"