- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई-मुंबई महानगरपालिकेने दि, १६ जूनपासून पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. लिटरमागे २५ पैसे ते चार रुपयांपर्यंत ही वाढ प्रस्तावित आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही पाणीपट्टी वाढ होण्यापासून रोखावी अशी मागणी करत पालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढीला भाजपाचा विरोध असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
एकाबाजूला मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देऊन एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी वाढवून दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हे चालणार नाही असे शेलार म्हणाले. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सातही तलावांमध्ये ४ जून २०२३पर्यंत फक्त ११.७६ टक्के म्हणजे १ लाख ७४ हजार दशलक्ष लिटर जलसाठा शिल्लक आहे. यातून पुढील महिनाभर मुंबईकरांची तहान भागू शकेल. पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती ओढवू शकते.परिणामी मुंबईला अतिरिक्त पाण्याची गरज भासू शकते. त्यामुळे राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिकेने सरकारकडे केली होती. मुंबईला राज्य शासनाच्या कोट्यातील अतिरिक्त पाणी साठा देण्याचे मान्य केल्याबद्दल शिंदे- फडणवीस सरकारचे त्यांनी आभार मानले.
तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. दि, ४ जून रोजी सातही धरणांत १ लाख ७४ हजार ९३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. राखीव साठ्यावर मदार भातसा धरणातून ७५ हजार दशलक्ष पालिकेला मिळावी अशी मागणी होती.
याबाबत आज पालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल यांच्याशी चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी राज्य शासनाने आपला अतिरिक्त पाणी साठा देण्याचे मान्य केले आहे असे शेलार म्हणाले.