‘आपला दवाखाना’ विरुद्ध भाजपच्याच तक्रारी; माेठा पाढा : केईएम, सायन, नायर, कुपर रुग्णालयांवर भार कायमच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 09:34 AM2023-08-11T09:34:37+5:302023-08-11T09:34:51+5:30
मालाड, गोरेगाव, मुलुंड भागात तक्रारीं
संतोष आंधळे, सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गाजावाजा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या आपला दवाखाना उपक्रमाविषयी भाजपचेच माजी नगरसेवक तक्रारी करत आहेत. मुंबई व उपनगरात १५९ ‘आपला दवाखाना’ सुरू झाले. १० लाख रुग्णांनी सहा महिन्यात उपचार घेतले, असा पालिकेचा दावा आहे. मात्र पालिकेच्याच केईएम, कुपर, सायन, नायर वरील ताण यामुळे कमी न होता वाढलाच आहे. याचा अर्थ मुंबईकर आजारी पडण्याचे प्रमाण वाढले की, आपल्या दवाखान्यात समाधान होईना म्हणून रुग्ण पुन्हा मोठ्या दवाखान्यात जाऊ लागले? हा विषय आता अभ्यासाचा झाला आहे.
आपला दवाखानाबाबत माजी नगरसेवकांचाही तक्रारीचा सूर आहे. आपल्या वॉर्डात अस्तित्वात असलेले आपला दवाखाना हे नागरिकांच्या प्रथमोचारासाठी नसून आर्थिक भार टाकणारे असल्याची टीका हे नगरसेवक करत आहेत.
तब्बल ५० कोटी रुपये आपला दवाखानावर या वर्षात खर्च करण्यात येणार आहेत. मात्र मालाड, गोरेगाव, मुलुंड अशा ठिकाणी असलेल्या आपला दवाखानाच्या तक्रारींचा पाढा वाचला तर हे पैसे नेमके जातात कुठे, हा प्रश्न पडावा.
अनेक ठिकाणी औषधांची उपलब्धता तर नाहीच, पण रक्तदाब आणि रक्तातील साखर मोजण्यासाठी आवश्यक साधनेही उपलब्ध नसल्याच्या तक्रारी माजी नगरसेवक करत आहेत.
आपला दवाखानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. सुविधा किंवा व्यवस्थापनाबद्दल काही तक्रारी आल्यास विभागीय आरोग्य वैद्यकीय अधिकारी / वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तक्रारीचे निवारण हाेते.
- डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका
जवळपास २५ ठिकाणी ‘आपला दवाखाना’ प्रस्तावित असूनही विविध प्राधिकरणांच्या आडमुठ्या धोरणामुळे, निधीअभावी, जागेअभावी या क्लिनिकला प्रशासकीय विलंब होत आहे.
- भालचंद्र शिरसाठ, भाजप प्रवक्ते
मुलुंड पूर्व येथील आनंद नगर येथे मागील १० महिन्यांपासून आपला दवाखाना प्रस्तावित आहे, मात्र निधीअभावी त्याचे काम सुरू होऊ शकले नाही.
- प्रभाकर शिंदे,
माजी गटनेते, भाजप
मालाड पूर्व येथील कुरार गावामध्ये मागील ६ महिन्यांपासून आपला दवाखाना प्रस्तावित असूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.
- प्रतिभा शिंदे,
माजी नगरसेविका, भाजप
गोरेगाव येथील आरे कॉलनीत तेथील आदिवासी पाड्यांसाठी आपला दवाखाना प्रस्तावित आहे. आरे दूध वसाहतीकडून एनओसी मिळत नसल्याने काम रखडले आहे. तेथील आदिवासी पाड्यांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत.
- प्रीती साटम, माजी नगरसेविका, भाजप
सुशोभीकरणावर खर्च करण्यासाठी पालिकेकडे १७०० कोटी रुपये आहेत, मात्र आपला दवाखान्याच्या सुविधांसाठी निधी नाही. अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहेच, बहुतांश ठिकाणी त्यांच्या पगारासाठीही पैसे नाहीत. गरिबांसाठीच्या या दवाखान्याच्या उद्देशाला पालिकेने हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जाहिरातींकडे लक्ष देण्यापेक्षा गैरसुविधांकडे लक्ष द्यावे.
- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस
मालाड ऑर्लेम चर्च येथील आपला दवाखान्यातील डॉक्टरांना फोन करून दवाखान्यात बोलावून घ्यावे लागते. इथे धनुर्वाताचे इंजेक्शनही उपलब्ध नाही. इतर औषध पुरवठ्याबाबत भीषण परिस्थिती आहे. डॉक्टरांच्या केबिनमध्ये एसी आहे, मात्र रुग्ण बसत असलेल्या ठिकाणी लाइट नसल्याने महिला रुग्ण त्या ठिकाणी येण्यास टाळाटाळ करतात. ज्या चाचण्या क्लिनिकमध्ये होणे अपेक्षित आहे त्यासाठी त्यांना बाजूच्या पालिका रुग्णालयात पाठविले जाते.
- सेजल देसाई, माजी नगरसेविका, भाजप