मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आगामी एक महिन्यात अन्य पक्षांमधील लहान-मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभेच्या ४० हून अधिक जागा जिंकण्यासाठी पक्षप्रवेशाची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. काँग्रेसचे काही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.
काँग्रेस प्रभावी आहे अशा भागातील नेत्यांशी चर्चा केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. विदर्भ, मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, आठ ते दहा अशा लोकसभा जागा ज्या जिंकण्यात भाजप व महायुतीला अडचणी येऊ शकतात. तेथील अन्य पक्षांच्या स्थानिक वजनदार नेत्यांना पक्षात आणण्याचे चालले आहे.
जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील आणि धुळ्याचे बाळासाहेब भदाणे बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पाटील पिता-कन्येला दोन दिवसांपूर्वीच प्रदेश काँग्रेसने निलंबित केले होते. बावनकुळे यांनी अलीकडेच घेतलेल्या एका बैठकीत महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांमधील आपापल्या भागात प्रभाव असलेल्यांना नेत्यांना पक्षात आणण्याचे आदेश दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी हे प्रवेश घ्या, असेही त्यांनी सांगितले होते. पक्षाचे अ. भा. सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हेही त्यावेळी उपस्थित होते. दर तीन-चार दिवसांआड विविध पातळ्यांवर पक्षप्रवेश घेण्याचे ठरविण्यात आले आहे.