राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव, आघाडीच्या नेत्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:11 AM2020-05-21T03:11:36+5:302020-05-21T06:59:14+5:30
भाजपने हाती घेतलेले ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन खरे तर ‘भाजप बचाव’ नाटक आहे, अशी टीका थोरात यांनी केली.
मुंबई : सातत्याने राज्यपालांशी भेटून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा भाजप नेत्यांचा डाव असल्याचा आरोप राष्टÑवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
महाराष्टÑात राष्टÑपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. तर भाजप नेते रोज राज्यपालांना भेटत आहेत. याकडे लक्ष वेधून पाटील आणि थोरात यांनी सांगितले की, संपूर्ण देशावर कोरोना महामारीचे संकट असताना भाजप नेत्यांना राजकारण सूचत आहे. महाराष्टÑातून युपी, बिहारमध्ये गेलेल्या मजुरांनी महाराष्टÑाविषयी जे गौरवोद्गार काढले त्यामुळे भाजपचा पोटशूळ उठला आहे. भाजपने हाती घेतलेले ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन खरे तर ‘भाजप बचाव’ नाटक आहे, अशी टीका थोरात यांनी केली.
तर रुग्णसंख्या वाढली असती!
१५ मेपर्यंत मुंबईत साडेसहा लाख कोरोना रुग्ण असतील, असा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला होता. आज राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या आत आहे. त्यांच्यापैकी १० हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याने गेला सव्वा महिना सहा लाखांहून अधिक परप्रांतीय मजुरांच्या निवास, भोजन आणि वैद्यकीय उपचारांची सोय केली. आजमितीला ५ लाख परप्रांतीय मजूर सुखरुप परतले आहेत. प्रत्येक यंत्रणा आपापल्या परीने या लढाईत सहभागी झाल्याने हे शक्य झाले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
हा तर कोरोना योद्धाचा अपमान
महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीने लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, निषेध फलक फडकवून आंदोलन करणे हा समस्त कोरोना योध्दांचा अपमान आहे. सगळे जण एकजुटीने लढाई लढत असताना अशा आंदोलनातून महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.