वर्तमानपत्रांचा आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्षच देताहेत; सुप्रिया सुळेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 11:22 AM2023-09-25T11:22:38+5:302023-09-25T11:31:47+5:30

बावनकुळेंच्या या विधानाची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे. विरोधकांनी देखील आता या विधानावरुन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

BJP's policy is not to allow journalists to work fearlessly; Target of Supriya Sule | वर्तमानपत्रांचा आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्षच देताहेत; सुप्रिया सुळेंचा निशाणा

वर्तमानपत्रांचा आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्षच देताहेत; सुप्रिया सुळेंचा निशाणा

googlenewsNext

मुंबई: पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

बावनकुळेंच्या या विधानाची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे. विरोधकांनी देखील आता या विधानावरुन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत बावनकुळेंवर निशाणा साधला आहे. विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२४ ) शहरातील सावेडी येथील माउली सभागृहात महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे, असं बावनकुळे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, याची काळजी घ्या, असे बावनकुळे म्हणाले. दरम्यान बावनकुळे यांच्या उपस्थितीत नगर शहरातील माणिक चौकात मन की बात हा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यांनी तेलीखुंटपर्यंत पायी जात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे नागरिकांनी विविध ठिकाणी स्वागत केले.

Web Title: BJP's policy is not to allow journalists to work fearlessly; Target of Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.