Join us  

भाजपच्या पोलखोल यात्रा रथाची तोडफोड; फडणवीस म्हणाले, यात्रा सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:46 AM

चेंबूरमधील तोडफोडप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली असून, अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कारभाराविरोधात काढण्यात येणाऱ्या भाजपच्या पोलखोल यात्रेच्या रथाची तोडफोड करण्यात आल्याने भाजप-शिवसेना पुन्हा आमने-सामने आले आहेत. काहीही झाले तरी ही यात्रा थांबणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात पोलखोल यात्रा सुरू करण्याचे नियोजन भाजपने केले आहे; परंतु चेंबूरमध्ये या रथयात्रेचे उद्घाटन होण्यापूर्वीच यात्रेच्या रथाची तोडफोड करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर आणि भाजपच्या नेत्यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. रथयात्रेचे उद्घाटन चेंबूर येथे दरेकर यांच्या हस्ते होणार होते. त्यावेळी संबंधित रथयात्रेच्या रथाच्या समोरील बाजूस असलेली काच फोडण्यात आल्याचे दिसून आले. 

भ्रष्टाचार बाहेर काढतच राहूदेवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले की, यात्रेच्या पहिल्या जाहीर सभेनंतर विरोधक हादरले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची तोडफोड त्यांनी सुरू केली आहे; परंतु आम्ही घाबरणार नाही. यात्रा सुरूच राहील. भ्रष्टाचाराची पोलखोल सुरूच राहील. महाविकास आघाडीचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढतच राहू, असा इशाराही त्यांनी दिला.

- चेंबूरमधील तोडफोडप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली असून, अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितले. 

टॅग्स :भाजपादेवेंद्र फडणवीसशिवसेना