भाजपाचे पॉवर सेंटर @ वर्षा; उमेदवारीवाटपाची सर्व रणनीती ठरविली मुख्यमंत्र्यांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 01:44 AM2019-03-24T01:44:13+5:302019-03-24T01:44:41+5:30

महाराष्ट्रातील भाजपाचे लोकसभा उमेदवार नक्की करण्याचे काम अनेक वर्षे प्रमोद महाजन- गोपीनाथ मुंडे या नेत्यांच्या जोडीने केले.

BJP's power center @ varsha; Chief Minister announced all strategies for candidature | भाजपाचे पॉवर सेंटर @ वर्षा; उमेदवारीवाटपाची सर्व रणनीती ठरविली मुख्यमंत्र्यांनी

भाजपाचे पॉवर सेंटर @ वर्षा; उमेदवारीवाटपाची सर्व रणनीती ठरविली मुख्यमंत्र्यांनी

Next

- यदु जोशी

मुंबई : महाराष्ट्रातील भाजपाचे लोकसभा उमेदवार नक्की करण्याचे काम अनेक वर्षे प्रमोद महाजन- गोपीनाथ मुंडे या नेत्यांच्या जोडीने केले. २०१४ च्या निवडणुकीत आजचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा उमेदवारीवाटपात सिंहाचा वाटा होता. मात्र, या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकेका मतदारसंघात उमेदवार देताना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या महिना-दीड महिन्यातील राजकीय हालचालींचे सेंटर खऱ्या अर्थाने वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानच होते.
फडणवीस हे भाजपाचे
असे पहिले नेते ठरले की ज्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतींपासून महापालिकेपर्यंतच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा आज
नंबर १चा पक्ष आहे. खालच्या निवडणुकांत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे नाही उलट बळ द्यायचे आणि इतर पक्षांतील नेत्यांच्या सांगण्यावरून पक्षाबाबत कुठेही तडजोड करायची नाही ही सूत्री फडणवीस यांनी स्वीकारली आणि त्यातून मुंबई महापालिकेपासून राज्याच्या टोकावरील ग्रामपंचायतीपर्यंत कमळ फुलले.
विविध पक्षांतील लोक जोडण्याची फडणवीस यांची रणनीती ही आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवूनच होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी त्यांनी अतिशय चांगले संबंध ठेवले आणि लोकसभा जाहीर होताच त्यांचे पुत्र डॉ. सुजय यांना भाजपात आणले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह हे तर मुख्यमंत्र्यांचे फॅन होते. गेल्या साडेचार वर्षांत ते सातत्याने मुख्यमंत्र्यांना भेटत असे त्यांनीच सांगितले आहे. एकाचवेळी विखे आणि मोहिते या अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादीतील मोठ्या घराण्यांना भाजपासोबत आणण्याचे कसब मुख्यमंत्र्यांनी दाखविले.
निवडणुकीसाठी दोन महिन्यांत वर्षावर रात्री २ पर्यंत बहुतेक दररोजच बैठकी झाल्या. त्यात कधी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तर कधी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार होते.
पंतप्रधानांपासून भाजपाचे अन्य नेते काही प्रसंगांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी जाहीरपणे आदराने बोलले. मुख्यमंत्र्यांनी मात्र ते कटाक्षाने टाळले. महाराष्ट्राचे राजकारण कोणाच्या सावलीतून बाहेर काढायचे हे त्यांनी मनोमन ठरविले व त्यानुसार रणनीती आखली. अन्य पक्षांतील नेता मोठा आहे म्हणून त्याच्यासमोर वा त्याच्या सांगण्याने कच्चा उमेदवार भाजपा देईल, असा काही राजकीय पंडितांचा तर्क होता गतकाळात काही भाजपा नेत्यांनी तसे केलेही. फडणवीस त्या मोहजालात अडकले नाहीत. बारामतीसह पक्षाचे सर्व उमेदवार ठरविताना त्यांनी कुठलीही तडजोड स्वीकारली नाही. मुख्यमंत्री एकदा काही पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, ‘वन कान्ट ड्राइव्ह मी’ म्हणजे मला कोणी मनासारखे वळवू शकत नाही. त्यांची रणनीती बघितली की त्याचा सहज प्रत्यय येतो.

मुख्यमंत्र्यांना आलेले अपयश
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांना एनडीएमध्ये परत आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केले; पण त्यात त्यांना यश आले नाही.
- बहुजन विकास आघाडीचे नेते आ. हितेंद्र ठाकूर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना बिनशर्त पाठिंबा दिला; पण फडणवीस त्यांची साथ टिकवू शकले नाहीत. शेवटी ठाकूर महाआघाडीसोबत गेले.
- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने खासदारकी देऊनही त्यांना सोबत ठेवण्यात अपयश.
- पोटनिवडणुकीत
जिंकूनही पालघरची
जागा भाजपाकडून सेनेकडे गेली.

मुख्यमंत्र्यांनी केलेली मोठी आॅपरेशन्स
शिवसेना कितीही नाही म्हणत असली तरी युतीसाठी राजी केले.
डॉ. सुजय विखेंना भाजपात आणून उमेदवारी दिली.
रणजितसिंह मोहिते यांना भाजपात आणले.
भारती पवार यांना पक्षात आणून उमेदवारी दिली.
राज्यसभा सदस्य संजय काकडे यांना सोबत ठेवण्यात यश.
रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे यांच्या पक्षाला एकही जागा न देता महायुतीत कायम ठेवण्यात यश.

Web Title: BJP's power center @ varsha; Chief Minister announced all strategies for candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.