स्थापना दिनानिमित्त भाजपाचे शक्तिप्रदर्शन, येणार तीन लाख कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 04:53 AM2018-04-05T04:53:23+5:302018-04-05T04:53:23+5:30
भारतीय जनता पार्टीची स्थापना ३८ वर्षांपूर्वी ६ एप्रिल रोजी मुंबईत झाली. त्याचे औचित्य साधून प्रदेश भाजपाचा महामेळावा वांद्रेच्या बीकेसी मैदानावर येत्या शुक्रवारी होणार आहे. या महामेळाव्याला राज्यभरातून तीन लाखाहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती...
मुंबई - भारतीय जनता पार्टीची स्थापना ३८ वर्षांपूर्वी ६ एप्रिल रोजी मुंबईत झाली. त्याचे औचित्य साधून प्रदेश भाजपाचा महामेळावा वांद्रेच्या बीकेसी मैदानावर येत्या शुक्रवारी होणार आहे. या महामेळाव्याला राज्यभरातून तीन लाखाहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज पत्र परिषदेत दिली.
या महामेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदी मार्गदर्शन करतील. केंद्रात असलेले राज्यातील भाजपाचे सर्व मंत्री तसेचसर्व आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी यांच्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
या महामेळाव्याच्या निमित्ताने भाजपा जबरदस्त शक्तिप्रदर्शन करणार आहे. या महामेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधकांना आपली ताकद दाखवून देण्याचा भाजपाचा हा प्रयत्न असेल. शिवसेनेसह कोणत्याही मित्र पक्षांच्या नेत्यांना महामेळाव्याचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. हा केवळ भाजपाचा महामेळावा आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
२०१४ मध्ये राज्यात सत्तेत आल्यापासून भाजपाने ग्राम पंचायतींपासून महापालिकांच्या अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. त्या सर्व ठिकाणचे लोकप्रतिनिधी तसेच एक बूथ पंचवीस युथ या रचनेतील हजारो कार्यकर्तेही महामेळाव्यात उपस्थित राहतील.
ंआमदार, खासदारांची झाडाझडती
राज्यातील भाजपाचे सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांची झाडाझडती राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे स्वतंत्रपणे घेणार आहेत. त्यांची बैठक एमसीएमध्ये ६ तारखेच्या महामेळाव्यानंतर सायंकाळी होईल.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा देण्याचे काम हा महामेळावा नक्कीच करेल.
- खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.
रॅलीद्वारे शहांचे स्वागत
या महामेळाव्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे गुरुवारी सायंकाळी मुंबईत आगमन होईल. विमानतळापासून त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत करणार आहेत.
२८ विशेष रेल्वेगाड्या
५ हजार बसेस आणि २८ विशेष रेल्वे गाड्यांमधून लाखो कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. मुंबईतील रेल्वेस्थानकांहून मेळाव्याच्या ठिकाणी त्यांच्या नेआण करण्याची विशेष व्यवस्था असेल. त्यासाठी कुर्ला, वांद्रे, दादर, सीएसटी, लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी स्टॉल उभारण्यात येणार आहे.महिला कार्यकर्त्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.