डोंबिवली : शहरांतर्गत अनधिकृत रिक्षा स्टॅण्डचा बोलबाला, अशा आशयाचे वृत्त गुरुवारी लोकमतने प्रसिद्ध करताच शहर भाजपा पूर्व मंडल कार्यकारिणीने त्याचा आधार घेऊन वाहतूक विभागाने यामध्ये तातडीने कायमची सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचे पत्र मुख्य शाखेला धाडले आहे. पूर्व मंडल अध्यक्ष शशिकांत कांबळेंसह सरचिटणीस संजय बिडवाडकर यांनी दिलेल्या पत्रामध्ये वेळोवेळी रिक्षाचालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांना साकडे घालण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात त्यावर कृती होताना दिसत नसल्याचे म्हटले आहे. पूर्वेकडील भागात जेथे वाहतूक शाखेचे मुख्य कार्यालय आहे, त्याच्याबाहेरच रिक्षा कशाही उभ्या असतात. त्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसवण्यासाठी संबंधित कर्मचारी कमी पडत आहेत. अनेकदा कारवाई करण्याचे तोंडदेखले अवसान आणत गल्लीबोळांमध्ये चिरीमिरी घेत असल्याचेही दिसून येते, असा आरोपही करण्यात आला आहे. अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटूनही त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. अधिकारीही फिल्डवर कमी अन् अन्य ठिकाणीच जास्त असल्याचेही दिसून येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. आगामी १५ दिवसांमध्ये याबाबत योग्य ती सुधारणा आणि कारवाई न झाल्यास नागरिकांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यातून कायदा सुव्यवस्था हाताबाहेर गेल्यास त्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची राहील, असा इशारा दिल्याचे बिडवाडकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
भाजपाचा आंदोलनाचा इशारा
By admin | Published: September 13, 2014 12:18 AM