Join us

भाजपचे आक्रोश आंदोलन स्थगित, आशिष शेलार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 12:23 PM

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात घटनेमुळे हे आंदोलन न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यासंदर्भात माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

मुंबई : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज होणारे भाजप आणि महायुतीचे आक्रोश आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका मुख्यालयावर आज मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा निघणार असून मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याला प्रत्त्युत्तर म्हणून भाजपाने आक्रोश आंदोलन पुकारले होते. मात्र, बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात घटनेमुळे हे आंदोलन न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यासंदर्भात माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

आशिष शेलार ट्विटद्वारे म्हणाले, "संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्या ही सहवेदना! स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा शोकभावना व्यक्त केल्या आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहचत आहेत. या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजप आणि महायुतीचे "आक्रोश आंदोलन" आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही. पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू!"

दरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत. 

टॅग्स :आशीष शेलारभाजपाबुलडाणासमृद्धी महामार्गअपघात